आधी वृक्ष तोड नंतर परवानगी प्रक्रिया ?

नवी मुंबई- :एमआयडीसी भागात आधी वृक्ष तोड  केली जाते आणि नंतर त्याच वृक्षांना तोडण्याबाबत परवानगी  प्रक्रिया राबवली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.अशा परवानगी प्रकियेने विनापरवाना वृक्ष तोड करणाऱ्यांच्या गुन्ह्यांवर पांघरून टाकण्याचे काम एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांमार्फत केले जात आहे का ? असा सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे.

एमआयडीसीच्या महापे कार्यालयात वृक्ष अधिकारी आणि वनस्पती तज्ञांचा अभाव असल्याने वृक्षांबाबत सर्व प्रकिया येथील तांत्रिक प्रशिक्षण घेतलेल्या अभियंत्यांना पार पाडाव्या लागतात. येथील अभियंत्यांवर स्थापत्य आणि पाणीपुरवठयाचा भार असतो. त्यामुळे वृक्ष तोडबाबत काय प्रकिया राबवली जाते हे अभियंत्यांसाठी एक कोडच आहे कारण या भागात विनापरवानगी वृक्ष तोड  केल्या प्रकरणी पर्यावरण प्रेमींनी तक्रारी केल्या आहेत. मात्र चार महिने उलटून देखील या तक्रारीवर कारवाई करण्यात आली नाही. तर आता प्रादेशिक कार्यालयाच्या हद्दीत काही झाडे प्रत्यारोपण करण्यासाठी प्रकिया राबवली गेली आहे. आणि त्याकरिता नागरीकांच्या हरकती सुचना मागवल्या आहेत. मात्र ही प्रकिया पूर्ण होण्याआधीच ही झाडे छाटणी करण्यात आल्याचे समोर आले आहे. असाच प्रकार तळोजा एमआयडीसीत देखील नुकताच घडला आहे. त्यामुळे एमआयडीसी  परिसरात आधी वृक्ष तोड केली जाते आणि नंतर त्याच वृक्षांच्या बाबतीत वृक्ष तोड आणि स्थलांतर करण्याच्या परवानगी देण्याचा अजब कारभार सुरू असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे एमआयडीसीच्या या अजब प्रकारामुळे पर्यावरण प्रेमींकडुन नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

अनधिकृत होर्डिंग्ज ‘मेट्रो रेल्वे’ला धोका; नागरिकांमध्ये नाराजी