कंत्राटदाराकडून २० हजाराची लाच स्विकारणा-या सरपंचाला अटक

पनवेल : गावात करण्यात आलेल्या विकास कामाच्या मुल्यांकन दाखल्यावर स्वाक्षरी करण्यासाठी कंत्राटदाराकडे २५ हजार रुपये लाचेची मागणी करुन तडजोडीअंती २० हजार रुपयांची लाच स्विकारणा-या पवनेल तालुक्यातील उसर्ली खुर्द या गावच्या सरपंच अतुल आनंद तांबे (३५) याला ऍन्टी करप्शन ब्युरोच्या नवी मुंबई युनिटने बुधवारी दुपारी रंगेहात अटक केली आहे.  

या घटनेतील तक्रारदार कंत्राटदार असून त्याने पनवेल तालुक्यातील मौजे डेरवली मातोश्री सोसायटी समोरील रस्ता तसेच डेरवली बस थांबा ते साई निकेतन पर्यंतच्या रस्त्याचे काँक्रीटीकरण केले होते. सदरचे विकास काम पुर्ण झाल्यानंतर या विकास कामाच्या मुल्यांकन दाखल्यावर सरपंचाची स्वाक्षरी घेणे गरजेचे असल्याने कंत्राटदाराने उसर्ली ग्रुप ग्रामपंचायतीचे सरपंच अतुल तांबे यांची भेट घेतली होती. मात्र सरपंच अतुल तांबे यांनी विकास कामाच्या मुल्यांकन दाखल्यावर स्वाक्षरी करण्यासाठी कंत्राटदाराकडे २५ हजार रुपये लाचेची मागणी केली. त्यामुळे कंत्राटदाराने मंगळवारी नवी मुंबई ऍन्टी करप्शन ब्युरोकडे याबाबत तक्रार दाखल केली होती.  

त्यानंतर कंत्राटदाराने सरपंच अतुल तांबे यांच्यासोबत तडजोड केल्यानंतर तांबे यांनी २० हजार रुपये लाच स्विकारण्याचे कबुल करुन नवीन पनवेल येथील विचुंबे गाव येथे कंत्राटदारास भेटण्यास बोलावले. त्या अनुषंगाने ऍन्टी करप्शन ब्युरोने बुधवारी दुपारी नवीन पनवेल येथे सापाळा लावला होता. यावेळी सरपंच अतुल तांबे यांनी कंत्राटदाराकडून २० हजार रुपयांची लाच स्विकारल्यानंतर ऍन्टी करप्शन  ब्युरोच्या पथकाने त्यांना रंगेहात पकडले. त्यानंतर सरपंच अतुल तांबे यांच्या विरोधात पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करण्यात आल्याची माहिती नवी मुंबई ऍन्टी करप्शन ब्युरोच्या पोलीस उपअधिक्षक ज्योती देशमुख यांनी दिली.

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

समीर वानखेडे यांच्या नावावर असलेला बारचा परवाना कायमस्वरुपी रद्द