नवीन प्रभाग रचनेमुळे इच्छुक ‘कोलांडउडी’च्या तयारीत?

वाशी ः २०२२ मध्ये होणारी नवी मुंबई महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक बहुसदस्यीय पध्दतीने होणार असून, या निवडणुकीसाठी प्रारुप प्रभागांच्या भौगोलिक सीमा प्रसिध्दीची अधिसूचना राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी प्रसिध्द केली आहे. मात्र, नवीन प्रभाग रचनेत बऱ्याच भाई नगरसेवकांचे प्रस्थापित प्रभाग तुटले असून, त्यांच्या प्रभागात नवीन भाग जोडले गेले आहेत. त्यामुळे तुटलेल्या आणि नवीन भाग जोडलेल्या प्रभागात निवडणूक लढवणे काही उमेदवारांना अवघड जाणार आहे. परिणामी स्वतःचे राजकीय अस्तित्व व़Àायम राखण्यासाठी पक्ष बदलणे सोपा मार्ग असल्याने आगामी काळात अनेक इच्छुक राजकीय कोलांडउड्या मारण्याची शक्यता राजकीय धुरीणांकडून वर्तविली जात आहे.

१९९५ पासून नवी मुंबई महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक एकल पध्दतीने होत आहे. त्यामुळे नवी मुंबईतील बहुतांशी माजी नगरसेवकांनी आपल्याला प्रभागात त्यांचे प्राबल्य कायम राखले आहे. मात्र, आता होणारी महापालिका निवडणूक बहुसदस्यीय पध्दतीने होणार असून, पहिल्यांदाच पॅनल पध्दतीने होणाऱ्या महापालिका निवडणुकीला नवी मुंबई शहरातील उमेदवार सामोरे जाणार आहेत.

यापूर्वीच्या सन-२०१५ मधील महापालिका निवडणुकीमध्ये एक सदस्यीय १११ प्रभाग होते. मात्र, सन-२०२२ मधील महापालिका निवडणूक ३ सदस्यीय पॅनल पध्दतीने होणार असून, ४१ प्रभाग असणार आहेत. यामध्ये ४० प्रभाग ३ सदस्यीय आणि १ प्रभाग २ सदस्यीय असणार असून, एकूण १२२ सदस्य असणार आहेत. या निवडणुकीकरीता प्रारुप प्रभाग रचना १ फेब्रुवारी रोजी प्रसिध्द करण्यात आली असून, त्यावर वादंग माजले आहे. सदर महापालिका प्रभाग रचना नियमबाह्य पध्दतीने गेल्याचा आरोप आमदार गणेश नाईक यांनी केला आहे. प्रभाग रचना विरोधात न्यायालयात दाद मागणार असल्याचा इशारा आ. गणेश नाईक यांनी दिला आहे.

नवीन प्रभाग रचनेच आधीचे बरेच जुने वॉर्ड तोडण्यात आले असून, नवीन प्रभागांना जोडले गेले आहेत. त्यामुळे मागील २० ते २५ वर्षांपासून आपल्या प्रभागात प्रस्थापित असलेल्या अनेक मातब्बर माजी नगरसेवकांना नवीन प्रभाग रचनेचा फटका बसला आहे. नवीन प्रभागात निवडणूक लढवणे प्रस्थापितांना आता आव्हान ठरणार आहे. नवीन प्रभाग रचनेत बहुतांशी माजी भाजप नगरसेवकांचे प्रभाग तुटले आहेत. त्यामुळे आपले राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी सोयीच्या प्रभागातील प्राबल्य ओळखून आगामी काळात इच्छुक उमेदवार पक्ष बदलतील, असा राजकीय जाणकारांचा कयास आहे. 

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

सिडको युनियनवर पुन्हा एकदा प्रगती पॅनेलचे वर्चस्व