चुकीच्या पध्दतीने केलेल्या प्रभाग रचनेविरोधात न्यायालयात जाणार- आ. गणेश नाईक

नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी करण्यात आलेली प्रभाग रचना  चुकीच्या आणि नियमबाहय पध्दतीने झाली असून त्याविरोधात भाजपा न्यायालयात जाणार आहे, असा इशारा आमदार गणेश नाईक यांनी दिला आहे. राजकीय फायद्यासाठी जनतेची गैरसोय केल्याचे या प्रभाग रचनेतून दिसून येते आहे.

नवी मुंबई महापालिकेची निवडणूक एप्रिल २०२२मध्ये होणे अपेक्षित आहे. यंदाच्या निवडणुकीसाठी पालिका क्षेञात ११ नविन प्रभागांची भर पडली आहे. त्यामुळे एकुण प्रभागांची संख्या १११ वरून १२२ वर गेली आहे. सोमवारी मध्यरात्री ही नविन प्रभाग रचना महापालिका प्रशासनाने पालिकेच्या संकेतस्थळावर  अपलोड केली.

नविन प्रभाग रचनेवर तीव्र आक्षेप घेत  आ. गणेश नाईक यांनी प्रभाग रचना करणाऱ्या पालिकेच्या अधिकाऱ्यांनी सत्ताधारी राजकीय पक्षांच्या दबावाखाली या पक्षांना लाभ पोहोचविण्यासाठीच प्रभाग रचना चुकीच्या पध्दतीने केली आहे, असा आरोप केला आहे. यामध्ये पालिकेचे अधिकारी आणि प्रितनियुक्तीवर आलेले अधिकारी सामिल आहेत. शहराच्या एकुण लोकसंख्येला एकुण प्रभागांनी भागून जे उत्तर येईल तेवढी सरासरी लोकसंख्या एका प्रभागाची असायला हवी होती. मात्र संबधित अधिकाऱ्यांनी सत्ताधारी  राजकीय पक्षांना लाभ पोहोचविण्यासाठी प्रभाग रचनेचे चुकीचे गणित केले आहे. पालिका निवडणुकीच्या संभाव्य प्रभाग रचनेत बेकायदा काम होण्याची शक्यता आमदार नाईक यांनी राज्यपाल, निवडणुक आयोग, जिल्हाधिकारी, पालिका आयुक्त या सर्वांना अगोदरच वेळोवेळी पत्र पाठवून व्यक्त केली होती. तरी देखील प्रभाग रचनेमध्ये हेराफेरी झालीच आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे.

ऐरोली विधानसभा क्षेत्रातील ऐरोली, दिघा या भागातील प्रभाग २३ हजार लोकसंख्येचे केले आहेत. त्यामुळे ऐरोली विधानसभा क्षेत्रात जास्त प्रभाग झाले आहेत.  तर बेलापूर विधानसभा क्षेत्रात ३० हजार लोकसंख्येचे प्रभाग केल्याने या विधानसभा क्षेत्रातील प्रभागांची संख्या कमी झाली आहे. १२२ प्रभागांपैकी अनेक  प्रभागांमध्ये चुकीची रचना करण्यात आली असून या विरोधात कोर्टात दाद मागणार आहे. ज्या ज्या प्रभागात चुकीची प्रभाग रचना करण्यात आली आहे त्या प्रत्येक प्रभागासाठी स्वतंत्र याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात येणार असून निष्णात वकीलांची नियुक्ती करणार आहे, असे लोकनेते आमदार नाईक म्हणाले. पालिकेच्या ज्या अधिकाऱ्यांनी राजकीय दबावापोटी चुकीची आणि नियमाबाहय प्रभाग रचना केली आहे त्यांची चौकशी करावी आणि त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

 नवीन प्रभाग रचनेमुळे इच्छुक ‘कोलांडउडी’च्या तयारीत?