महापालिकेच्या रुग्णांना नकार. रेफर रुग्णाला दारात अडवलं... फोर्टिसच्या बेपर्वाईला मनसेची चपराक
नवी मुंबईतील गावठाणातील सिटी सर्वेक्षण पुन्हा सुरू करण्याची आ.मंदा म्हात्रे यांची मागणी
नवी मुंबई:- नवी मुंबईतील विस्तारित गावठाणातील थांबविण्यात आलेले सिटी सर्वेक्षण पुन्हा सुरू करून ग्रामस्थांच्या घरांना प्रॉपर्टी कार्ड मिळावे, याकरिता बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार सौ.मंदाताई म्हात्रे यांची ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांजसह नुकतीच बैठक संपन्न झाली. यावेळी भाजपा महामंत्री डॉ.राजेश पाटील, विजय घाटे, नगरसेवक सुनील पाटील उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनीही सकारात्मक निर्णय घेत नवी मुंबईतील गावठाणांचे सिटी सर्वेक्षण लवकरात लवकर सुरू करण्याचे सूचित केले. सदर विषय हा आपणच पटलावर आणला असून आपण वेळोवेळी पाठपुरावा करीत आहात, परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सदर सिटी सर्वेक्षणास सुरुवात होऊ शकली नाही. लवकरच मे.टेक्कोम अर्बन मॅनेजमेंट कन्सल्टंट अँड सर्व्हिस प्रोवायडर्स एजन्सीला आदेश देण्यात येतील असेही जिल्हाधिकारी यांनी सांगितले.
यावेळी आमदार सौ.मंदाताई म्हात्रे यांनी सांगितले कि, नवी मुंबईतील विस्तारित गावठाणातील घरांचे सिटी सर्वेक्षण करून प्रॉपर्टी कार्ड मिळणेबाबतचा प्रश्न अनेक वर्षे प्रलंबित असून सदर सिटी सर्वेक्षणास शिदोरे अँड शिदोरे कंपनी मार्फत बेलापूर गावातून सुरुवात करण्यात आली होती. अर्धेअधिक सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर काही कारणास्तव सदर सर्वेक्षण बंद करण्यात आले. त्यानंतर पुन्हा मे.टेक्कोम अर्बन मॅनेजमेंट कन्सल्टंस अँड सर्व्हिस प्रोवायडर्स या एजन्सीमार्फत दि.7 मार्च 2020 पासून दिवाळे, सारसोळे व सानपाडा या गावठाण क्षेत्रातून सिटी सर्वेक्षण सुरू करण्याचे जिल्हाधिकारी यांनी आदेश देऊनही आजपर्यंत त्यास सुरुवात करण्यात आलेली नाही. सदरबाबत पाठपुरावा केला असता कोरोना लॉकडाऊनमुळे सिटी सर्वेक्षणास सुरुवात होऊ न शकल्याचे समजले. परंतु सद्यस्थितीत कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असून शासनाचे सर्व नियम पाळून सिटीसर्वेक्षण सुरु करण्यास हरकत नसल्याने पुढील कार्यवाही केल्यास उचित होणार आहे. सदरबाबत ग्रामस्थांमध्येही संभ्रम निर्माण होत असून सदर सिटी सर्वेक्षणास पुन्हा सुरुवात करून त्यांना त्यांच्या हक्काचे प्रॉपर्टी कार्ड दिल्यास खऱ्या अर्थाने त्यांना न्याय मिळेल. म्हणून नवी मुंबईतील विस्तारित गावठाणातील थांबविण्यात आलेले सिटी सर्वेक्षण पुन्हा सुरू करून त्यांच्या घरांचे प्रॉपर्टी कार्ड देण्यात यावे, याकरिता सदर बैठक आयोजित करण्यात आली होती.