महापालिकेच्या रुग्णांना नकार. रेफर रुग्णाला दारात अडवलं... फोर्टिसच्या बेपर्वाईला मनसेची चपराक
परमबीर-वाझे गुप्त भेटी प्रकरणी नवी मुंबई पोलिस दलातील चार अधिकारी व कर्मचाऱयांना कारणे दाखवा
नवी मुंबई : अँटिलिया बॉम्बस्फोट प्रकरणातील प्रमुख आरोपी सचिन वाझे व मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांची चांदिवाल कमिशनच्या कार्यालयात गुफ्त भेट झाल्याच्या आरोप प्रकरणी नवी मुंबई पोलिसांच्या कैदी पार्टीतील चार अधिकारी व कर्मचाऱयांना नवी मुंबई पोलिस आयुक्तांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
याप्रकरणी आरोपी सचिन वाझे याला तळोजा तुरुंगातून मुंबई येथील चांदिवाल कमिशनच्या कार्यालयात सुनावणीसाठी घेऊन जाणाऱया कैदी पार्टीतील अधिकारी व कर्मचाऱयांची चौकशी करण्याचे आदेश नवी मुंबईचे पोलिस आयुक्त बिपीनकुमार सिंह यांनी गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस आयुक्तांना दिले होते. सदर चौकशीत नवी मुंबई पोलिस दलातील एक पोलिस उपनिरीक्षक व तीन पोलिस कर्मचाऱयांना प्रोटोकॉलचे आणि नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोषी ठरवण्यात आले आहे. त्यामुळे नवी मुंबई पोलिस आयुक्तांनी या प्रकरणातील दोषी अधिकारी व कर्मचाऱयांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
अँटिलिया बॉम्बस्फोट प्रकरणातील प्रमुख आरोपी निलंबित सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन वाझे यास तळोजा तुरुंगातून चांदीवाल कमिशनकडे सुनावणीकरिता घेऊन जाण्यासाठी हे चार पोलीस गार्ड (कैदी पार्टी) ड्युटीवर होते. पोलिसांनी कथितरित्या, अप्रत्यक्षरित्या आरोपी सचिन वाझे यास अधिकृत परवानगीशिवाय मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांना भेटण्याची परवानगी दिली. चांदीवाल कमिशनने त्यांना नोव्हेंबरमध्ये सुनावणीसाठी बोलावले होते. त्या कार्यालयात दोघांची गुप्त बैठक झाल्याचा आरोप आहे.