खारघर: पालिकेच्या क्लीन मार्शल पथकाने शनिवार सायंकाळी फेरीवाल्यांवर कारवाई करून पदपथ मोकळे केल्याने नागरिक समाधान व्यक्त करीत आहे.
खारघर मध्ये फेरीवाल्यांनी पदपथावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केल्यामुळे नागरिकांना रस्त्यावरून चालावे लागत आहे. खारघर मध्ये पालिकेचे अतिक्रमण पथक आहेत. मात्र खारघर तळोजा परिसराचा व्याप्ती जास्त असल्यामुळे योग्य प्रकारे कारवाई केली जात नसे. खारघर मध्ये सिडकोने फेरीवाल्याना भूखंड उपलब्ध करून देखील काही बहुतांश फेरीवाल्यानी पदपथ अडवून व्यवसाय करीत असल्यामुळे फेरीवाल्यावर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून केली जात होती. दरम्यान पालिका प्रशासनाने फेरीवाल्यावर कारवाई करण्यासाठी स्वतंत्र्य एजन्सीची नेमणूक केली आहे. नव्याने नेमणूक केलेल्या क्लीन मार्शल पथकाने प्रभाग अधिकारी जितेंद्र मढवी यांच्या मार्गदर्शनाखाली खारघर सेक्टर सात, अकरा,बारा, अठरा एकोणीस आदी भागात पदपथावर कारवाई करून साहित्य जप्त करून पदपथ मोकळे केल्याने नागरिक समाधान व्यक्त करीत आहे.
राज्यात कोरोना आणि ओमायक्रॉन या कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने दहा तारखे पासून कठोर निर्बंध लागू केले असून हॉटेल, मॉल आणि थिएटर रात्री दहा वाजेपर्यंतच सुरू राहणार असल्याचे जाहीर केले आहे. मात्र खारघर मध्ये हॉटेल,चायनीज गाड्या सुरु असल्याचे निदर्शनास आल्याने पालिका आणि खारघर पोलीस प्रशासनाने मोहीम राबवून दोन दिवसात दहा जमावबंदी कायदा मोडणाऱ्या हॉटेल,आणि खाद्यपदार्थ विक्रेत्या रेस्टारेंट वर कारवाई करून 67700 दंड वसूल केल्याने हॉटेल मालकांचे धाबे दणाणले आहे.