ईटीसी केंद्रातील दिव्यांग विद्यार्थी-पालकांतर्फे दिवाळी वस्तू-फराळ प्रदर्शन
निलू निरंजना (चरित्र)
निलू निरंजना गव्हाणकर हिचा जीवनपट म्हणजे हे पुस्तक. निलू अर्थात निरंजनाचं संगीत व चित्रपट क्षेत्रातील कार्य, तिचा जगप्रवास, भारतीयांसाठी, महाराष्ट्रात केलेलं, ठरवलेलं समाजकार्य, त्याचा उद्देश, तिच्या विचारांची भरारी व उंची, कार्याचा दर्जा, तिच्या आयुष्यातील पेचप्रसंग, तिचा सेवाव्रतीपणा, तिचं समाजातील दुर्बल गरजवंतांसाठीचं पैसा ओतणं, मानवतेच्या कार्यातील ‘वेडेपण' इत्यादींना लेखिकेने रंगीत रेशमी धाग्यांचा एखादा सुंदर गोफ सहज गुंफावा अशा रीतीने मांडलेला आहे त्यामुळे वाचताना अजिबात कंटाळा येत नाही.
नुकतच सुप्रसिद्ध लेखिका मृणालिनी चितळे यांच निलू निरंजना गोष्ट हिची पृथ्वीमोलाची हे चरित्रपर पुस्तक वाचले. पुस्तक हातात घेऊन चाळले तर असे जाणवले की या पुस्तकात काहीतरी वेगळं आहे. वाचायला सुरुवात केली तर ते मध्येच सोडून खाली ठेवू नये असे वाटत राहिले.
निलू निरंजना गव्हाणकर हिचा जीवनपट म्हणजे हे पुस्तक. चार-चौघीसारखी निरंजना पण तरीही तिच्या कृतीतलं वेगळेपण लेखिकेने नेमकं हेरलं व तिचं ‘निलूपण' चरित्ररूपात अनेकांपर्यंत पोहविण्याचा लेखिकेचा हा प्रयत्न.
निरंजना ही खूप मोठी उद्योजिका नाही, लेखिका, गायिका, समाजसेविका नाही पण तिची, धडाडी, जिद्द, प्रामाणिकपणा, माणुसकीचा गहिवर आणि सकारात्मकता आपल्याला थक्क करते. १९६८ साली खिशात फक्त आठ डॉलर घेऊन अमेरिकेत उच्च शिक्षणासाठी गेलेली निरंजना ५४ वर्षांच्या वास्तव्यानंतर भारतात परत येते. तिकडे अमेरिकेत गेल्यावर तिकडची माणसं प्रेमानं आपुलकीनं आपलीशी करते. तिचा पहिला वाढदिवस साजरा करणारे नेल्सन कुटुंब, ती अख्खी गल्ली, तिच्या प्रथम भेटीवेळी घातलेल्या मोरपिशी रंगाच्या कुर्त्याच्या कापडात तिचा फोटो जपून ठेवणाऱ्या मिसेस रिट्झमन, निरंजना दुसरीकडे राहायला गेली तरी तिच्या खोलीच्या दारावरील ‘निरंजनाज रूम' अशी फळी न काढणारी एमिली, मैत्रीण नन्सीची आई मेरी हिनं निरंजनावर पोटच्या मुलीप्रमाणे केलेलं प्रेम...इतकं की निरंजनावर झालेल्या प्राणघातक हल्यानंतर हॉस्पिटलमधून सरळ स्वतःच्या घरी घेऊन आली. अगदी निरंजनाची आंघोळ घालण्यापासून तिची सुश्रूषा करणाऱ्या सूचो व नन्सी, सॅनफ्रान्सिस्को मधील पाचव्या रस्त्यावर बेघर अवस्थेत राहणारा पॉल, कृष्णवर्णीय गरीब ऑन्ड्रिया...अशी कितीतरी रक्ताच्या नात्यापेक्षाही माणुसकीच्या नात्याने घनिष्ठ झालेली ही दोस्त मंडळी आणि बेक्टेलसारख्या कंपनीतील तिचे वैशिष्ट्यपूर्ण स्थान व महत्त्वपूर्ण कार्य सारंच आपल्याला चकित करतं.
तसेच तिच्यावर प्रेम करणारा भारतातील मित्र परिवार, ‘पगली' संबोधून तिच्यावरील हल्ल्याने गहिवरणारा व तिला आपल्या बोटातील अंगठी बहाल करणारा ‘पंचम', मानसकन्या संबोधणारे बाबा व साधनाताई आमटे, विजय तेंडुलकर, पु. ल. व सुनीताबाई ..इ मित्रमंडळी पाहता वाचकाच्या मनात निरंजनाबद्दल आदराची भावना दुणावते.
माणसामाणसातील नात्यांतील सामर्थ्य व मर्यादाही निरंजना जाणून होती. प्रियकरच नवरा झाल्यावर कसा बदलला व करियरला दुय्यम स्थान देऊनही लग्न टिकणं अशक्य वाटल्याने विवाहबंधनातून परस्परसंमतीने मुक्त झालेल्या निरंजनाने दुसरा विवाह न करता करियर वर लक्ष केंद्रित केलं...एकटेपणा अनुभवला; पण कधी एकाकी पडली नाही. आजूबाजूची माणसं, निसर्ग, पर्यावरण आपली मानून, अनुकूलनातून विकसित होत राहिली. वाचक म्हणून तिचं हे वेगळेपण मला अधिक भावलं. परिस्थितीला दोष न देता, संकंटांनी न हादरता, धीरानं, धैर्यानं, हुशारीनं, आंतरिक शक्तीचा शोध घेत, आपल्या कामाला पुरेपूर न्याय देत, स्वावलंबीपणे यशस्वी जीवन जगत राहिली. यशस्वी वाटचाल करत राहिली हा आदर्श घेण्यासारखा आहे.
निलू अर्थात निरंजनाचं संगीत व चित्रपट क्षेत्रातील कार्य, तिचा जगप्रवास, भारतीयांसाठी, महाराष्ट्रात केलेलं, ठरवलेलं समाजकार्य, त्याचा उद्देश, तिच्या विचारांची भरारी व उंची, कार्याचा दर्जा, तिच्या आयुष्यातील पेचप्रसंग, तिचा सेवाव्रतीपणा, तिचं समाजातील दुर्बल गरजवंतांसाठीचं पैसा ओतणं, मानवतेच्या कार्यातील ‘वेडेपण' इत्यादींना लेखिकेने रंगीत रेशमी धाग्यांचा एखादा सुंदर गोफ सहज गुंफावा अशा रीतीने मांडलेला आहे त्यामुळे वाचताना अजिबात कंटाळा येत नाही. लेखिकेची लेखनशैली चरित्रमांडणीसाठी अशी सहज सोपी आहे. व्यर्थ फाफटपसारा किंवा एखाद्या प्रसंगात अती अडकणे जाणवत नाही. नेमके प्रसंगवर्णन तेही समर्पक शब्दांत. उगाच अलंकारिक शब्दांचा भडिमार नाही, की काल्पनिक रंगभरण नाही.
लेखिका आपली ही कलाकृती मैत्र भावनेला समर्पित करताना लिहिते,
दाटून जिथं येत नाही मत्सराचं मळभ
जिथं भरून येत नाही, गैरसमजाचा काळा ढग
ज्याच्या मनी सदा नितळ आभाळ हसत असतं
असं एक नातं असतं ‘मैत्र' त्याचं नाव असतं!
निलू निरंजना गव्हाणकर ही लेखिकेची जिवाभावाची मैत्रीण. अशावेळी चरित्रकाराला तटस्थपणे त्या व्यक्तीचं चरित्रलेखन करणं खरं तसं अवघड असतं. पण लेखिका मृणालिनी चितळे ह्या अनुभवी कसलेल्या चरित्रकारा असल्यामुळे निरंजनाचं लौकिक जीवन मांडतांना तिचं अलौकिकत्वसद्धा सहजरीत्या नेमकेपणाने शब्दबद्ध करते.
ज्येष्ठ लेखक भारत सासणे यांची समर्पक प्रस्तावना लाभलेले हे पृथ्वीमोलाची गोष्ट सांगणारं चरित्र रसिक, अभ्यासू वाचकांनी जरूर वाचावे. निलू निरंजनाचं स्वागत व लेखिकेचे अभिनंदन, शुभेच्छा आणि आभारही!
लेखिका - मृणालिनी चितळे पृष्ठे - २३४
मूल्य - रु.३०० /-
-पुष्पा कोल्हे