कर्करोग दिनी 267 नागरिकांची विशेष कर्करोग तपासणी
नवी मुंबई : नवी मुंबई महापालिका आरोग्य विभागाच्या वतीने 4 फेब्रुवारी या जागतिक कर्करोग दिनाच्या निमित्ताने नवी मुंबई शहरातील नागरिकांकरिता कर्करोग तपासणी मोहीम आयोजित करण्यात आली होती. या मोहिमेंतर्गत नवी मुंबई शहरात यापूर्वी माँसाहेब मिनाताई ठाकरे रूग्णालय नेरूळ तसेच 13 नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रे अशा एकूण 14 ठिकाणी स्थापित केलेल्या कर्करोग तपासणी केंद्रात (Cancer Screening Center) कर्करोग तपासणी करण्यात आल्या. कर्करोगाचे लवकर निदान होणेच्या अनुषंगाने 128 पुरुष व 139 स्त्रिया अशा एकूण 267 नागरिकांची तपासणी करण्यात आली. कर्करोगाचे लवकर निदान होण्याकरिता त्यांच्या कर्करोग तपासण्या करण्यात आल्या.
नवी मुंबई महापालिकेने 11 ऑक्टोबर 2024 पासून नवी मुंबई शहरातील नागरिकांचे कर्करोग निदान लवकर होउून कर्करोगग्रस्त नागरिकांवर जलद उपचार होण्याकरिता नेरुळ येथील माँसाहेब मिनाताई ठाकरे रूग्णालय आणि 13 नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रे अशा एकूण 14 ठिकाणी कर्करोग तपासणी केंद्र (Cancer Screening Center) सुरु करण्यात आलेली आहेत. जानेवारी अखेरपर्यंत या केंद्रांमध्ये 6764 पुरुष व 9075 स्त्रिया अशाप्रकारे एकूण 17839 इतक्या नागरिकांनी लवकर निदान होण्याच्या दृष्टीने कर्करोग तपासणी करुन घेतलेली आहे.
महापालिका कार्यक्षेत्रातील नागरिकांना कर्करोग संबंधित उपचारासाठी खाजगी किंवा टाटा हॉस्पिटल, परळ मुंबई आणि खारघर येथे लांब जायला लागू नये व त्यांच्यावर नवी मुंबई शहरातच उपचार व्हावेत यासाठी दि.17 जानेवारी 2025 पासून माँसाहेब मिनाताई ठाकरे रूग्णालय, नेरूळ येथे टाटा ॲक्ट्रेक (TATA ACTREC) यांच्या सहयोगातून कँसरग्रस्त रुग्णांकरिता 10 खाटांचे डे केअर केमोथेरपी सेंटर सुरु करण्यात आलेले आहे. त्याठिकाणी आतापर्यंत 8 रूग्णांनी उपचाराचा लाभ घेतला असून आज एका रुग्णाने डे केअर केमोथेरपी उपचार घेतला आहे.
4 फेब्रुवारी या जागतिक कर्करोग दिनाचे औचित्य साधून महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी नवी मुंबई शहरातील नागरिकांना त्यांचे आरोग्य निरामय व निरोगी रहावे या दृष्टीने कर्करोगविषयी कोणतीही शक्यता जाणवल्यास नवी मुंबई महानगरपालिकेने स्थापित केलेल्या कर्करोग तपासणी केंद्रात जाऊन कर्करोग तपासणी करून घेण्यासाठी जाहीर आवाहन केले आहे.