‘सर्जन'च्या प्रतिक्षेत इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालय

भिवंडीः शहरातील इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात गेल्या काही महिन्यांपासून सर्जन नसल्याने शस्त्रक्रियेेची गरज असलेल्या रुग्णांना ठाणे, मुंबई रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला जात आहे. मात्र, काही अतिगंभीर तसेच योग्य आणि तातडीचे उपचार आवश्यक असलेल्या रुग्णांना मुंबई, ठाणेतील रुग्णालयात जाण्यापूर्वीच मृत्यू होण्याचा धोका व्यवत केला जात आहे.

भिवंडीसह वाडा, पडघा, वज्रेश्वरी आदि भागातील नागरिकांना औषधोपचाराची सोय व्हावी याकरिता २०० बेडस्‌चे हॉस्पिटल करुन इंदिरा गांधी रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा दिला गेला. मात्र, या रुग्णालयामध्ये नेहमी विशेतज्ञ डॉक्टरांची कमतरता राहिली आहे. याबाबत शहरातील लोकप्रतिनिधी आणि समाजसेवकांनी मागणी करुनही डॉक्टर हजर झालेले नाहीत. तर काही हजर होऊन बदली घेत निघून गेले. सध्या या उपजिल्हा रुग्णालयात सर्जन, स्त्रीरोग तज्ञ, फिजिशियन नाहीत. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत असून नाईलाजास्तव नागरिकांना खाजगी रुग्णालयातून महागडे उपचार करुन घ्यावे लागत आहे.

रुग्णालयात मिळालेल्या माहितीनुसार या डॉक्टरांची शासनाकडून नियुक्ती झाली आहे. परंतु, ते रुग्णालयात कर्तव्यावर हजर झाले नाहीत. मागील महिन्यात मुंबई-नाशिक महामार्गावर कसबा धाब्यासमोर झालेल्या अपघातात दुचाकीस्वार आय्याज रज्जाक शेमले (२०) या गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा सायन रुग्णालयात दाखल करण्यापूर्वी मृत्यू झाला. त्याला भिवंडी मधील इंदिरा गांधी रुग्णालयात वेळीच उपचार मिळाले असता तर त्याचा प्राण वाचू शकले असते, असे म्हटले जात आहे.

भिवंडी शहरालगत मुंबई-नाशिक महामार्ग जात आहे. तर अहमदाबादकडे जाणाऱ्या गाड्या अंजूरफाटा येथून जात असतात. तसेच भिवंडी शहरातून जड-अवजड वाहने जात असतात. त्यामुळे या परिसरात नेहमी अपघाताच्या घटना घडत असतात. अशा कोणत्याही अपघाती घटना घडल्यानंतर वेळीच उपचार न मिळाल्याने रुग्णांना आपले प्राण गमवावे लागू शकतात अथवा खाजगी रुग्णालयात उपचार घ्यावे लागत आहे, असे स्थानिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे या साऱ्या प्रकाराची दखल घेत शासनाने प्रशासकीय अधिकारी, सर्जन, स्त्रीरोग तज्ञ आणि फिजिशियन नियुक्त करण्याची मागणी भिवंडी आणि परिसरातील जनता करीत आहे.

भिवंडीतील इंदिरा गांधी रुग्णालय ठाणेतील सिव्हील हॉस्पिटलच्या अंतर्गत येत असून सिव्हील रुग्णालय प्रशासनाकडे नेहमी प्रशासकीय अधिकारी, सर्जन, स्त्रीरोग तज्ञ आणि फिजिशियन या डॉक्टरांची लेखी मागणी केली आहे. मात्र, कोणी डॉक्टर येथे हजर होत नाही. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. डॉक्टरांना आणण्यासाठी आमचे प्रयत्न प्रशासकीय पातळीवरुन सुरु आहेत.
-डॉ. अन्सारी मोहम्मद इजहार, वैद्यकीय अधिकारी, इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालय, भिवंडी. 

Read Previous

क्लाऊड नाईन रुग्णालयाला महापालिकेची नोटीस

Read Next

‘अपोलो'मध्ये ७८ बोन मॅरो ट्रान्सप्लांटस्‌ पूर्ण