मिरा-भाईंदर महापालिका शाळांची गुणवत्ता वाढविण्यासाठी प्रयत्न

भाईंदर : मिरा-भाईंदर महापालिकेने, महापालिका शाळेत डिजीटल क्लासील्म, डिजीटल ग्रंथालय सुरू केले आहे. प्रजासत्ताक दिनी त्याचा शानदार सोहळ्यात अनावरण करण्यात आले. यासाठी आयडीबीआय बँकेने सामाजिक दायीत्व निधीतून (सीएसआर) ३२ लाखांचा निधी उपलब्ध करुन दिला आहे.

मिरा-भाईंदर महापालिकातर्फे १९ महापालिका शाळांमध्ये शैक्षणिक सुविधांचा वाटप आणि अनावरण सोहळा आयोजित करण्यात आला. या उपक्रमाचा डिजीटल शुभारंभ आयुक्त संजय काटकर आणि वरिष्ठ प्रादेशिक अधिकारी देवजानी मंडल यांच्या हस्ते घोडदेव शाळा क्रमांक-८ येथे करण्यात आला.

मिरा-भाईंदर महापालिकेच्या एकूण ३६ शाळांमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षण उपलब्ध करुन देण्यासाठी महापालिका प्रशासन सातत्याने प्रयत्नशील असते. महापालिका शाळांची वेळोवेळी पाहाणी करण्यात येते. त्यातून शाळांमधील कमतरता निदर्शनास आल्यानंतर त्या दूर केल्या जातात. महापालिकेच्या नाविन्यातापूर्ण कक्षाने (इनोव्हेशन सेल) आवश्यक साधनांची सूची काढून आवश्यक ती साधने शाळांना लवकरात लवकर मिळावी यासाठी प्रयत्न केले जातात. आयडीबीआय बँकेने ‘सीड' या सामाजिक दायित्व निधीतून (सीएसआर) प्रकल्पांतर्गत, ३२ लाखांच्या निधीतून आधुनिक साधने दिली आहेत. यामध्ये १९ शाळांसाठी स्मार्ट क्लास डिजीटल पॅनल, डिजीटल ग्रंथालय, संगणक संच आणि वॉटर प्युरिफायर यासारखी आधुनिक आणि गरजेची साधने उपलब्ध करुन दिली आहेत. या नवीन साधनांमुळे विद्यार्थ्यांना आधुनिक शैक्षणिक सुविधा मिळणार असून त्यांचा सर्वांगीण विकास होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

सदर सोहळ्याप्रसंगी महापालिका उपायुक्त प्रसाद शिंगटे, शहर अभियंता दीपक खांबित, सहाय्यक आयुक्त दिपाली जोशी, आयडीबीआय बँकेचे संजय वालेचा आणि अर्णब मुखर्जी तसेच महापालिका शाळांचे शिक्षक, विद्यार्थी आणि आयडीबीआय बँकेचे ब्रांच व्यवस्थापक, कर्मचारी आदि उपस्थित होते.

महापालिकेच्या शाळेत समाजातील सर्व स्तरातील सर्वसामान्य विद्यार्थी शिकत असतात. त्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करीत असतो. त्यामुळे विद्यार्थ्यांना कुठल्याही शैक्षणिक साहित्य, सोयी सुविधांची कमतरता भासू नये यासाठी त्यावर लक्ष ठेवून ते पुरवल्या जातात. विद्यार्थ्यांचे भविष्य उज्वल भवितव्यासाठी उत्तम शिक्षणाबरोबर त्यांच्या नोकरीसाठी एम्प्लॉयमेंट-१८ सारखा यशस्वी उपक्रम राबविला जात आहे. तसेच सामाजिक दायीत्वातून देण्यात येणारे योगदान या विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी, या शहराच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण आहे.
-संजय काटकर, आयुवत-मिरा भाईंदर महापालिका. 

Read Previous

पाचवी व आठवीच्या स्कॉलरशीप परीक्षेत नमुंमपा शाळेतील 49 विद्यार्थ्यांचे कौतुकास्पद यश

Read Next

ठाणे महापालिका क्षेत्रात ८१ शाळा अनधिकृत