आनंदवनसाठी केली खाऊच्या पैशांतून आर्थिक मदत

नवी मुंबई : १३ ऑगस्ट २०२४ रोजी ७५ वर्षे पूर्ण झालेली व आनंद वन येथे कुष्ठरोगी बांधवांची काळजी घेत, त्यांच्या पुनर्वसन करण्यासाठी झटणारी महामानव बाबा आमटे संस्थापित महारोगी सेवा समिती आर्थिकदृट्या अडचणीत आली आहे म्हणून आनंदवन मित्र मंडळ - नवी मुंबईतर्फे सढळ हस्ते आर्थिक मदत करण्याचे आवाहन केले जाताच श्रमिक शिक्षण संस्थेचे रा. फ. नाईक विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय कोपरखैरणे येथे ५ वी ते १२ वी या वर्गांतील मुलांनी प्रत्येकी एक ते पाच रुपये, आपल्या खाऊचे, एका दिवसाचे पैसे वाचवण्याचे अनोखे अभियान राबवले.

महाऱोगी सेवा समिती, वरोरा यांचे प्रतिनिधी सुभाष कुळकर्णी यांच्याकडे सदर मदत निधी पेटी जमा केली. यात सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनीदेखील सहभाग घेतला. डॉ.विकास आमटे यांच्या नावाने पत्र लिहून आपला खारीचा वाटा स्वीकारण्याची विनंतीदेखील विद्यार्थ्यांनी केली आहे. आमचे विद्यार्थी महापूर, करोना काळ किंवा जेव्हा समाजाला खरेच गरज असते तेव्हा एक पाऊल पुढे टाकत, काम करत असतात; नाम फाउंडेशन यांनादेखील शाळेने मोठी आर्थिक मदत केली होती, असे सहकार्य करण्याचे संस्कार मुलांवर होणे गरजेचे आहे, ही धारणा संस्थेची असल्याचे मुख्याध्यापक प्रा.रवींद्र पाटील यांनी सांगितले. यासाठी प्रशासकीय अधिकारी नरेंद्र म्हात्रे, उपमुख्याध्यापिका सौ. चारुशीला चौधरी, पर्यवेक्षिका सौ.नसीम कुरणे आणि सर्व शिक्षक यांचे सहकार्य लाभले.

Read Previous

पाचवी व आठवीच्या स्कॉलरशीप परीक्षेत नमुंमपा शाळेतील 49 विद्यार्थ्यांचे कौतुकास्पद यश

Read Next

मिरा-भाईंदर महापालिका शाळांची गुणवत्ता वाढविण्यासाठी प्रयत्न