शैक्षणिक शिष्यवृत्तीसाठी ऑनलाईन अर्ज भरण्यास मुदतवाढ देण्याची मागणी

नवी मुंबई : नवी मुंबई महापालिका कार्यक्षेत्रातील खासगी शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या गरीब विद्यार्थ्यांसाठी असलेल्या शैक्षणिक शिष्यवृत्ती योजनेकरिता ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ देण्याची मागणी माजी नगरसेविका सौ. सुजाता सुरज पाटील यांनी महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्याकडे निवेदनातून केली आहे.

नमुंमपा कार्यक्षेत्रातील आर्थिक दुर्बल, विधवा, निराधार, स्थानिक प्रकल्पग्रस्त, सफाई कामगार, नाका कामगार आणि  मागासवर्गीय घटकातील इयत्ता पहिली ते महाविद्यालयीन पर्यंत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक शिष्यवृत्ती वितरण करणे अशी योजना ऑनलाईन पध्दतीने सन २०२४-२५ या आर्थिक वर्षांकरिता महापालिका प्रशासनाकडून राबविण्यात येत आहे. या योजनेसाठी ऑनलाईन पध्दतीने अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत ३० नोव्हेंबर २०२४ असून हे अर्ज  www.schemenmmc.com  या संकेतस्थळावर स्विकारण्यात येत आहेत. महापालिका प्रशासन शैक्षणिक शिष्यवृत्ती राबवित असलेली योजना प्रशंसनीय असून महागाईच्या काळात खासगी शाळांमध्ये मुलांना शिक्षण देणाऱ्या गरीब पालकांना या योजनेचा हातभार लागत असतो. अधिकाधिक विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळावा यासाठी महापालिका प्रशासन प्रयत्न करत असते. गरजू लाभार्थ्यांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहनही महापालिका प्रशासनाकडून सातत्याने करण्यात येत असल्याचे सौ. सुजाता पाटील यांनी निवेदनात म्हटले आहे.

यंदा नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात विद्यार्थ्यांना दिवाळीची सुट्टी होती. त्यानंतर राज्याची विधानसभा निवडणूक, मतदान, निकाल असा कार्यक्रम २४ नोव्हेंबर २०२४ पर्यंत चालला. या निवडणूक काळात सामाजिक, शैक्षणिक, राजकीय आणि अन्य वर्गातील घटक व्यस्त राहिले. नवी मुंबईतील खासगी शाळांमध्ये गोरगरीब, अल्प तसेच अत्यल्प उत्पन्न गटातील पालकांची मुले शिक्षण घेत असतात. आपल्या मुलांना चांगले शिक्षण मिळावे यासाठी पोटाला चिमटा घेऊन वेळ पडल्यास उधारउसनवार करुन ते खासगी शाळेची फी भरत असतो. त्यांच्याकडे घरी संगणक नसतो आणि हातात महागडा स्मार्ट फोनही नसतो. चांगला फोन असला तरी अर्ज भरण्याबाबत फारशी माहिती नसते. दरवर्षी राजकीय पक्षांची जनसंपर्क कार्यालये आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या कार्यालयातूनच मोठ्या प्रमाणावर या शिष्यवृत्ती अर्जांचा ऑनलाईन पध्दतीने संकेतस्थळावर सादरीकरण (जमा) होत असते.

यंदा तर राजकीय तसेच सामाजिक घटकांची जनसंपर्क कार्यालये निवडणुकीत व्यस्त असल्याने शिष्यवृत्ती अर्ज भरण्याकडे कोणाला वेळ मिळाला नाही. त्यामुळे खासगी शाळेतील विद्यार्थ्यांच्या पालकांना शिष्यवृत्तीसाठी अर्ज भरणे शक्य झाले नाही. आता अंतिम मुदत अवघ्या तीन-चार दिवसांनी समाप्त होणार असल्याने हजारो विद्यार्थी या योजनेपासून वंचित राहण्याची भिती आहे. यामुळे खासगी शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे आणि त्यांच्या पालकांचे नुकसान होणार असून महापालिकेच्या चांगल्या योजनेचा हेतुही साध्य होणार नाही. दिवाळी आणि त्यानंतर विधानसभा निवडणुकीची परिस्थिती पाहता गोरगरीब वर्गातील विद्यार्थी शिष्यवृत्ती योजनेपासून वंचित राहू नये यासाठी महापालिका प्रशासनाने शिष्यवृत्ती योजनेचे अर्ज भरण्याकरिता १५ डिसेंबर २०२४ पर्यंत मुदतवाढ देण्याची मागणी सौ. सुजाता पाटील यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे. 

Read Previous

पाचवी व आठवीच्या स्कॉलरशीप परीक्षेत नमुंमपा शाळेतील 49 विद्यार्थ्यांचे कौतुकास्पद यश

Read Next

‘मॉडर्न स्कुल'च्या ३ विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड