वृध्द महिलेला जखमी करुन दागिने लुटणारा रिक्षा चालक अवघ्या काही तासात अटक  

नवी मुंबई : रिक्षामध्ये बसलेल्या वृध्द महिलेला आडमार्गावर नेऊन तिच्या डोक्यात दांडक्याने हल्ला करुन दागिने आणि मोबाईल फोन लुटून फरार झालेल्या रिक्षा चालकाला कळंबोली पोलिसांनी आणि मध्यवर्ती गुन्हे कक्षाने अवघ्या काही तासात अटक केल्याची घटना घडली आहे. अनंता पालेकर (३९) असे या आरोपी रिक्षा चालकाचे नाव असून  त्याला पतपेढी कडून कर्ज भरण्यासाठी तगादा लावण्यात येत असल्यामुळे त्याने सदरचे कृत्य केल्याचे प्राथमिक तपासात आढळून आले आहे. पोलिसांनी त्याच्याकडून लुटलेले सर्व दागिने आणि मोबाईल फोन हस्तगत केले आहे.  

या घटनेतील तक्रारदार गुलाब केशव पाटील (६०) या तळोजा येथील मजकुर गावात राहण्यास असून १७ ऑवटोबर रोजी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास ती तळोजा येथील आरएएफ सिग्नल येथून नावडे येथे आरोपी अनंता पालेकर याच्या रिक्षामधून नावडे येथे जात होती. नावडे गावाजवळ रिक्षामध्ये असलेली दुसरी महिला उतरुन गेल्यानंतर रिक्षा चालक पालेकर याने गुलाब पाटील यांना नावडे येथे न उतरवता, त्यांना नावडेच्या पुढे आडमार्गे रेल्वे पटरीच्या बाजुने निर्जन ठिकाणी नेले.  

त्यानंतर त्याने गुलाब पाटील यांच्या डोक्यामध्ये लाकडी दांडका मारुन त्यांना जखमी केले. तसेच त्यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने आणि मोबाईल फोन असा सुमारे सव्वा तीन लाख रुपये किंमतीचा ऐवज लुटून पोबारा केला होता. या घटनेनंतर जखमी गुलाब पाटील यांनी काही नागरिकांच्या मदतीने कळंबोली पोलीस ठाण्यात धाव  घेऊन घडल्या प्रकाराची माहिती दिल्यानंतर कळंबोली पोलिसांनी त्यांच्यावर रुग्णालयात उपचार केले. त्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीकांत धरणे यांच्या सुचनेनुसार पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरु केली.  

या तपासणीत आरोपी चालवित असलेल्या रिक्षाचा नंबर मिळाल्यानंतर गुन्हे शाखा मध्यवर्ती कक्षाने तात्काळ आरटीओ कडून सदर रिक्षाची माहिती मिळवली असता, या रिक्षाचा मालक पनवेलच्या वळवली गावात राहणारा अनंता पालेकर असल्याचे आढळून आले. त्यानंतर मध्यवर्ती गुन्हे शाखेने आणि कळंबोली पोलिसांनी या आरोपी रिक्षा चालकाच्या मोबाईल लोकेशनवरुन त्याचा माग काढत त्याला रात्री ११ च्या सुमारास पनवेलमधून अटक केली. तसेच त्याने गुलाब पाटील यांचे लुटलेले सर्व दागिने, रोख रक्कम आणि मोबाईल फोन हस्तगत केले. न्यायालयाने त्याची २१ ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी ठोठावली आहे.  

दरम्यान, अटक आरोपी अनंता पालेकर याने एका पतपेढीकडून कर्ज काढले होते. सदर कर्जाचे हप्ते भरल्यानंतर देखील पतपेढी कडून पैसे वसुलीसाठी त्रास देण्यात येत होता. तसेच त्याची रिक्षा जप्त करण्याची धमकी देण्यात येत होती. त्यामुळे अनंता पालेकर घाबरुन रिक्षा देखील चालवत नव्हता. मात्र, १७ ऑवटोबर रोजी त्याच्या रिक्षामध्ये गुलाब पाटील या अंगावर मोठया प्रमाणात दागिने घालून बसल्यानंतर त्याच्या अंगावरील दागिने लुटून पतपेढीचे कर्ज फेडण्याचा विचार त्याच्या डोक्यात आला. त्यामुळे त्याने गुलाब पाटील यांना आडमार्गावर नेऊन त्यांना लुटल्याचे तपासात आढळून आले आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा अधिक तपास करण्यात येत आहे. 

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

अंमली पदार्थ विरोधी कक्षाची खारघरमध्ये धडक कारवाई