मुंबई विद्यापीठ ‘युवा महोत्सव'मध्ये महात्मा फुले महाविद्यालयाला ९ पारितोषिक

नवीन पनवेल : ‘रयत शिक्षण संस्था'च्या पनवेल येथील महात्मा फुले कला, विज्ञान, वाणिज्य महाविद्यालयाने ‘मुंबई विद्यापीठ' आयोजित ५७ व्या विभागीय ‘युवा महोत्सव'मध्ये उत्कृष्ट कामगिरी करीत ९ बक्षिसांची कमाई केली.

कर्जत येथील राहुल धारकर महाविद्यालयामध्ये ७ ऑगस्ट रोजी संपन्न झालेल्या ‘युवा महोत्सव'मध्ये स्नेहल पाटील हिने शास्त्रीय गायन आणि नाट्यसंगीत या गायन प्रकारामध्ये प्रथम क्रमांक तसेच सुगम संगीत आणि स्वरवाद्य या प्रकारांमध्ये अनुक्रमे तृतीय आणि उत्तेजनार्थ क्रमांक मिळविला. अमिषा भगत हिने मराठी वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त केला. तसेच पंकज पांडुळे आणि अमिषा भगत यांनी हिंदी वादविवाद स्पर्धेत प्रथम क्रमांक आणि मराठी वादविवाद स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकाविला. मानसी पासी हिने मेहंदी मध्ये द्वितीय क्रमांकाचे बक्षीस प्राप्त केले. स्नेहल पाटील, नाजुका मुकादम, भूमिका महाडीक, कोमल कदम, अरहंत कुशल वर्धन यांनी समूहगान स्पर्धेत उत्तेजनार्थ पारितोषिक मिळविले.

विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल प्रतिक्रिया देताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गणेश ठाकूर यांनी असे प्रतिपादन केले की,महाविद्यालयाने मागील शैक्षणिक वर्षातही युवा महोत्सवाच्या झोनल राउंडमध्ये दहा पारितोषिके मिळविली होती.व विद्यापीठाच्या अंतिम स्पर्धेतही सात पदके मिळविली होती.या वर्षीही विद्यार्थ्यांनी त्यात सातत्य राखले, या गोष्टीचा मला अभिमान वाटतो. दरम्यान, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गणेश ठाकूर यांनी सर्व विजेत्या विद्यार्थ्यांचे आणि सांस्कृतिक कमिटीचे अभिनंदन केले. सदर विद्यार्थ्याना महाविद्यालयाच्या सांस्कृतिक विभागाचे चेअरमन प्रा. प्रवीण गायकर, प्रा. डॉ. प्रफुल्ल वशेणीकर, प्रा. डॉ. लीन मेश्राम, डॉ. कीर्ती म्हात्रे, आदिंनी मार्गदर्शन केले.

Read Previous

पाचवी व आठवीच्या स्कॉलरशीप परीक्षेत नमुंमपा शाळेतील 49 विद्यार्थ्यांचे कौतुकास्पद यश

Read Next

 रा. फ.नाईक विद्यालय-कनिष्ठ महाविद्यालयात घर घर तिरंगा, हर घर तिरंगा मोहिमेचा उत्साह