‘स्वच्छता दिंडी स्पर्धा'च्या महाअंतिम सोहळ्यात स्वच्छता संदेश प्रसारित

नवी मुंबई : नवी मुंबईतील विद्यार्थ्यांमध्ये लहान वयातच स्वच्छतेचे संस्कार रुजावेत आणि दिंडीसारख्या परंपरेच्या माध्यमातून त्यांना संस्कृतीची ओळख व्हावी यादृष्टीने नवी मुंबई महापालिका क्रीडा-सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘स्वच्छता दिंडी' या आगळ्या-वेगळ्या उपक्रमाचा महाअंतिम सोहळा वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात प्रचंड जल्लोशात संपन्न झाला.

रबाले आंबेडकरनगर मधील राजर्षी छत्रपती शाहू महाराज विद्यालय नमुंमपा शाळा क्रमांक-१०४ या शाळेला आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांच्या हस्ते स्वच्छता दिंडी स्पर्धेत सर्वोत्तम सादरीकरणाबद्दल प्रथम क्रमांकाची सन्मानचिन्ह २५ हजार पारितोषिक रक्कम आणि प्रशस्तिपत्रासह प्रदान करण्यात आली. द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक श्रीराम विद्यालय, ऐरोली आणि तृतीय क्रमांकाचे पारितोषिक डीएव्ही पब्लिक स्कुल-नेरुळ यांनी संपादन केले. द्वितीय आणि तृतीय क्रमांकाच्या शाळेस अनुक्रमे २० हजार रुपये आणि १५ हजार रुपये रक्कमेची पारितेषिके सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्रासह प्रदान करण्यात आली. याशिवाय नमुंमपा शाळा क्र-४९, ऐरोली गांव शाळा नवी मुंबई महापालिका शाळांतील सर्वोत्कृष्ट दिंडी पारितोषिकाची १५ हजार रुपये रक्कमेसह मानकरी ठरली. शाळा क्र-७८ काशिराम हिंदी विद्यालय, गौतमनगर-रबाळे आणि विद्याभवन स्कुल, नेरुळ या शाळांनी उत्तेजनार्थ पारितोषिके मिळवली. सर्वोत्कृष्ट रंगभूषा आणि वेशभूषा पारितोषिक शाळा क्र-३३, पावणे गांव यांनी तसेच सर्वोत्कृष्ट आकर्षक दिंडी सजावट पारितोषिक शाळा क्र-३५, कोपरखैरणे यांनी प्राप्त केले.  

याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार, स्पर्धेच्या परीक्षक सुप्रसिध्द अभिनेत्री किशोरी अंबिये, महापालिका सचिव चित्रा बाविस्कर, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त डॉ. अजय गडदे, क्रीडा-सांस्कृतिक कार्य विभागाच्या उपायुक्त अभिलाषा म्हात्रे-पाटील, शिक्षणाधिकारी अरुणा यादव, क्रीडा अधिकारी रेवप्पा गुरव आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

नमुंमपा आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित ‘आंतरशालेय दिंडी स्पर्धा'मध्ये प्राथमिक फेरीत नमुंमपाच्या ४६ आणि खाजगी ४५ अशा एकूण ९१ शाळांतील ४ हजारहुन अधिक विद्यार्थ्यांनी उत्स्फुर्त सहभागी घेत सदरचा उपक्रम यशस्वी केला. विशेष म्हणजे स्पर्धेत सहभागी होण्यासाठी प्रत्येक शाळेने आपापल्या क्षेत्रीय स्तरावर ‘स्वच्छता दिंडी' आयोजित केली होती.

स्पर्धेत सहभागी ९१ शाळांची प्राथमिक फेरी ५ आणि ६ ऑगस्ट रोजी विष्णुदास भावे नाट्यगृह येथे विनारंगभूषा आणि वेशभूषा पार पडली. त्यामधून २१ शाळांची निवड प्राथमिक फेरीचे परीक्षक नाट्य-मालिका कलावंत कुणाल मेश्राम यांनी महाअंतिम फेरीसाठी केली. या महाअंतिम फेरीचे परीक्षण सिने, नाट्य-मालिका अभिनेत्री किशोरी अंबिये यांनी केले.

या स्पर्धेमध्ये सहभागी शाळांनी स्वच्छता विषयांतर्गत कचऱ्याचे विलगीकरण, सिंगल यूज प्लास्टिकवर बंदी, खारफुटीचे संवर्धन, जलस्त्रोत (वॉटरबॉडी) स्वच्छता आणि संवर्धन, माझी वसुंधरा उपक्रम, नवी मुंबई शहर सुशोभिकरण अशा ६ मुद्द्यांना अनुसरुन ७ मिनीटांचे सादरीकरण केले. यामध्ये भजन, कीर्तन, पोवाडा, भारुड, वारीतील रिंगण, वारीतील विशिष्ट नृत्य, सामाजिक संदेश देणारा अन्य सांस्कृतिक कलाप्रकार अशा विविध प्रकारे सादरीकरण करण्यात आले. महाअंतिम फेरीसाठी नाट्यगृहात वारकरी परंपरेचे दर्शन घडेल अशी वातावरण निर्मिती सजावर्टीद्वारे करण्यात आली होती. 

Read Previous

पाचवी व आठवीच्या स्कॉलरशीप परीक्षेत नमुंमपा शाळेतील 49 विद्यार्थ्यांचे कौतुकास्पद यश

Read Next

 मुंबई विद्यापीठ ‘युवा महोत्सव'मध्ये महात्मा फुले महाविद्यालयाला ९ पारितोषिक