४ हजारहुन अधिक विद्यार्थ्यांकडून स्वच्छता जागर

नवी मुंबई : नवी मुंबईची ओळख संपूर्ण देशभरात स्वच्छ-सुंदर शहर म्हणून केली जात असून स्वच्छतेची सवय मुलांमध्ये लहान वयापासूनच रुजावी यादृष्टीने विद्यार्थ्यांना केंद्रीभूत ठेवून नमुंमपा आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रम राबविण्यात येत असतात.

अशाच प्रकारचा ‘आंतरशालेय दिंडी स्पर्धा' असा अभिनव उपक्रम क्रीडा-सांस्कृतिक विभागाच्या वतीने सुरु आहे. स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत ‘नमुंमपा'च्या ४६ शाळा, ४५ खाजगी शाळा अशाप्रकारे एकूण ९१ शाळांतील ४ हजारहून अधिक विद्यार्थ्यांनी उत्स्फुर्त सहभागी होत यशस्वी केला.

स्पर्धेत सहभागी होण्यासाठी शाळांनी आपल्या क्षेत्रीय स्तरावर ‘स्वच्छता दिंडी' आयोजित करुन त्याची गुगल लोकेशन नमूद असलेली छायाचित्रे ‘स्वच्छता दिंडी स्पर्धा'चा अर्ज भरताना नवी मुंबई महापालिकेच्या सोशल मिडीया हँडलला टॅग करुन सादर करावयाची होती. त्यानुसार महापालिकेच्या ४६ आणि ४५ खाजगी अशा ९१ शाळांनी आपले अर्ज दाखल केले होते. त्याकरिता सदर शाळांनी आपापल्या परिसरात स्वच्छता दिंडी आयोजित केल्याने त्या शाळांच्या संपूर्ण परिसरात स्वच्छतेचा जागर झाला.

या ९१ शाळांची प्राथमिक फेरी ५ आणि ६ ऑगस्ट रोजी विष्णुदास भावे नाटयगृह, वाशी येथे रंगीत तालीम स्वरुपात विना रंगभूषा आणि वेशभूषा पार पडली. यामध्ये शाळांनी ‘स्वच्छता' विषयांतर्गत कचऱ्याचे विलगीकरण, सिंगल यूज प्लास्टिकवर बंदी, खारफुटीचे संवर्धन, जलस्त्रोत (वॉटरबॉडी) स्वच्छता-संवर्धन, माझी वसुंधरा उपक्रम, नवी मुंबई शहर सुशोभिकरण अशा सहा मुद्दयांना अनुसरुन ७ मिनिटात दमदार सादरीकरण केले. यामध्ये भजन, कीर्तन, पोवाडा, भारूड, वारीतील रिंगण, वारीतील विशिष्ट नृत्य, सामाजिक संदेश देणारा अन्य सांस्कृतिक कलाप्रकार अशा विविध प्रकारे शाळांनी आपले सादरीकरण केले.

प्राथमिक फेरीचे परीक्षण सुप्रसिध्द नाट्य तथा मालिका कलावंत कुणाल मेश्राम करीत असून प्राथमिक फेरीतून निवडक २५ शाळांची निवड अंतिम फेरीसाठी केली जाणार आहे.

स्वच्छता दिंडी स्पर्धेची अंतिम फेरी भावे नाट्यगृह येथे रंगभूषा आणि वेशभूषेसह ८ ऑगस्ट रोजी होणार असून पारितोषिक वितरण समारंभ अंतिम फेरीच्या सादरीकरणानंतर सायं. ४ वाजता संपन्न होणार आहे.

स्वच्छता दिंडी स्पर्धेत अंतिम विजेतेपद पटकाविणाऱ्या शाळेस २५ हजार रुपये तसेच द्वितीय क्रमांकाच्या शाळेस २० हजार रुपये, तृतीय क्रमांकाच्या शाळेस १५ हजार रुपये रक्कमेची पारितेषिके सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्रासह प्रदान करण्यात येणार आहेत. तसेच ५ हजार रुपये रक्कमेची २ उत्तेजनार्थ पारितोषिकेही दिली जाणार आहेत. याशिवाय दिंडी सजावटीस विशेष पारितोषिक असणार आहे.

Read Previous

पाचवी व आठवीच्या स्कॉलरशीप परीक्षेत नमुंमपा शाळेतील 49 विद्यार्थ्यांचे कौतुकास्पद यश

Read Next

 ‘स्वच्छता दिंडी स्पर्धा'च्या महाअंतिम सोहळ्यात स्वच्छता संदेश प्रसारित