कोपरखैरणे येथील विद्यादीप विद्यालयात सर्प विज्ञान कार्यक्रम

नवी मुंबई : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सानपाडा शाखेतर्फे सर्प विज्ञान कार्यक्रमाचे आयोजन ३ ऑगस्ट रोजी कोपरखैरणे सेक्टर ४ मधील विद्यादीप विद्यालयात करण्यात आले होते. यावेळी सर्प अभ्यासक उल्हास ठाकूर यांनी पीपीटीद्वारे मुलांशी संवाद साधला व त्यांच्या सापांबद्दलच्या अंधश्रद्धा दूर केल्या.

 सापाचे मुख्य दूध नसून अन्न उंदीर, बेडूक व छोटे किटक हे आहे. सापाच्या अंगावर केस कधीही नसतात; तर साप कात टाकताना त्या कातीचे पापुद्रे त्याच्या शरीराला चिकटलेले दिसतात. त्यालाच लोक सापाचे केस समजतात. सापाला एकापेक्षा अनेक डोकी कधीच नसतात; चुकुन असा अनेक डोकी असलेला साप जन्माला आलाच, तर त्याचे धड अनेक डोक्यांच्या आज्ञांचा तोल सांभाळू शकत नाही व तो लवकर मृत होतो. सापाच्या डोक्यावर नागमणी असतो हीसुध्दा अंधश्रद्धा आहे. सापाच्या डोक्यावर फुगीर भाग असतो त्यालाच लोक नागमणी समजतात. मांडूळ जातीचा साप तिजोरीत ठेवल्याने संपत्तीत वाढ होते; अशा अंधश्रद्धांमुळे मांडूळ जातीच्या सापांची अवैध तस्करी होते. साप डूख धरतो ही अंधश्रद्धा आहे, कारण सापाचा मेंदू इतका विकसीत नसतो की तो स्मरण करू शकेल अशा सापांबद्दलच्या विविध प्रकारच्या अंधश्रद्धा खोडून काढत ठाकूर यांनी विद्याथ्यार्ंशी संवाद साधला. साप हासुध्दा निसर्गातील एक घटक आहे, त्याचे निसर्गातील अस्तित्त्व मान्य करूया असा संदेश यावेळी विद्यार्थ्यांना देण्यात आला. या संवाद सत्रात महाराष्ट्र अंनिसचे कार्यकर्ते ज्योती क्षीरसागर, गजानंद जाधव व अशोक निकम यांनी सक्रिय सहभाग नोंदवला. यावेळी ५०हुन अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून सापांबद्दल उपयुवत माहिती जाणून घेतली 

Read Previous

पाचवी व आठवीच्या स्कॉलरशीप परीक्षेत नमुंमपा शाळेतील 49 विद्यार्थ्यांचे कौतुकास्पद यश

Read Next

४ हजारहुन अधिक विद्यार्थ्यांकडून स्वच्छता जागर