महापालिकेच्या रुग्णांना नकार. रेफर रुग्णाला दारात अडवलं... फोर्टिसच्या बेपर्वाईला मनसेची चपराक
नवी मुंबईतील शाळा-शाळांमध्ये झळकले स्वच्छता आकाश कंदील
नवी मुंबई : स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत ‘सफाई अपनाओ, बिमारी भगाओ' अभियान नवी मुंबई महापालिका क्षेत्रात उत्साहाने राबविले जात असून त्यामध्ये लोकसहभागावर भर दिला जात आहे. यात विद्यार्थ्यांना सहभागी करुन घेणाऱ्या उपक्रमांवर विशेष लक्ष दिले जात असून या माध्यमातून विद्यार्थ्यांवर संस्कारक्षम वयातच स्वच्छतेचे महत्व बिंबविले जात आहे.
अशाच प्रकारचा विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला चालना देणारा आणि त्यांच्या निर्मिती क्षमतेला वाव देणारा कागदी स्वच्छता आकाश कंदील निर्मितीचा अभिनव उपक्रम आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या संकल्पनेतून आणि अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ‘घनकचरा व्यवस्थापन विभाग'च्या सहयोगाने ‘महापालिका शिक्षण विभाग'तर्फे नवी मुंबईतील विविध शाळांमध्ये राबविण्यात आला
त्यामध्ये महापालिका क्षेत्रातील महापालिकेच्या ८० शाळा तसेच इतर खाजगी शाळांनीही उत्साही सहभाग घेतला. महापालिकेच्या शाळांमधील इयत्ता ७ वी ते ९ वीच्या विद्यार्थ्यांनी २९७ स्वच्छता आकाश कंदिलांची निर्मिती केली असून इतर २०० हून अधिक खाजगी शाळांतील विद्यार्थ्यांनी १५०० हून अधिक स्वच्छता आकाश कंदील बनविले आहेत. या आकाश कंदिलांवर ‘द्या प्लास्टिकला नकार' अर्थात ‘Say No to Plastic’ तसेच स्वच्छतेचे आणि पर्यावरण विषयक संदेश प्रदर्शित करण्यात आलेले आहेत.
आकाश कंदिलासारख्या सर्वांना आकर्षून घेणाऱ्या वस्तुची आपल्या हातून निर्मिती करण्याकरिता सर्व विद्यार्थ्यांमध्ये आनंद आणि उत्साह दिसून येत होता. त्यामुळे आकाश कंदील बनविताना विद्यार्थी समरसून गेल्याचे चित्र पहायला मिळाले. या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये स्वछता, प्लास्टिक प्रतिबंध आणि पर्यावरण विषयक प्रभावीरित्या जाणीव जागृती झाली.
विद्यार्थ्यांइतकेच या उपक्रमामध्ये शाळांचे मुख्याध्यापक आणि शिक्षक मार्गदर्शक म्हणून उत्साहाने सहभागी झाले होते. शिक्षण विभागाच्या उपायुक्त संघरत्ना खिल्लारे, ‘घनकचरा व्यवस्थापन विभाग'चे उपायुक्त डॉ. अजय गडदे, शिक्षणाधिकारी अरुणा यादव यांनी विविध शाळांना भेटी देत विद्यार्थ्यांचा उत्साह वाढविला.
‘घनकचरा व्यवस्थापन विभाग'कडून प्राप्त आकाश कंदील बनविण्याचे रंगीत कागद शाळांमध्ये वितरीत करण्यात आले होते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी स्वहस्ते बनविलेले स्वच्छतेचे आकाश कंदील शाळा-शाळांमध्ये स्वच्छता, प्लास्टिकमुक्ती आणि पर्यावरण संरक्षण, संवर्धनाचा संदेश देत झळकले.