महापालिकेच्या रुग्णांना नकार. रेफर रुग्णाला दारात अडवलं... फोर्टिसच्या बेपर्वाईला मनसेची चपराक
राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची उल्लेखनीय कामगिरी
ठाणे : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक (MUHS) आयोजित ‘राज्यस्तरीय संशोधन स्पर्धा २०२३-२४' मध्ये निमाई भावसार या (तृतीय वर्ष एमबीबीएस) विद्यार्थ्याने प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकावले. त्याने प्रेडिक्टिव्ह व्हॅल्यू ऑफ हिमोग्लोबिन टू क्रिएटिनीन रेशो फॉर कॉन्ट्रास्ट इंड्यूस्ड नेफ्रोपॅथी (Predictive Value of Haemoglobin to Creatinine Ratio for Contrast Induced Nephropathy) असा शोधनिबंध सादर केला. या शोधनिबंधामध्ये निमाई भावसार याने पेशंटच्या हिमोग्लोबिन आणि क्रिएटिनीनच्या गुणोत्तराद्वारे भविष्यात होऊ शकणाऱ्या किडनी फेल्युअरचा आढावा घेतला आहे. सदर संशोधन प्रकल्पाची ICMR अर्थात भारतीय आयुर्विज्ञान अनुसंधान परिषदेच्या राष्ट्रीय स्तरावरील संशोधनवृत्तीसाठी शॉर्ट टर्म स्टुडन्टशिप (STS) या कार्यक्रमांंतर्गत निवड झाली आहे.
सदर संशोधन भावसार याने राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालयाच्या जीवरसायनशास्त्र विभागप्रमुख डॉ. मोहीत रोजेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण केले. या संशोधनात त्याला बालरोगतज्ञ डॉ. जयेश पानोत यांचे सहकार्य लाभले.
प्लास्टिक रिकॉन्स्ट्रक्टिव्ह सर्जरी विभाग, टाटा मेमोरियल सेंटर मुंबई यांनी आयोजित केलेल्या राष्ट्रीय स्तरावरील प्रश्नमंजुषा स्पर्धेत राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालयाच्या परीक्षित सकलानी आणि केदार मोदी या विद्यार्थ्यांच्या संघाने प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकावले. देशभरातून ७२ संघांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला होता. त्यापैकी अंतिम फेरीसाठी पात्र ठरलेल्या ५ संघातून राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालयाच्या एमबीबीएस अंतिम वर्षाच्या विद्यार्थी संघाने बाजी मारली.
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय महाविद्यालय आणि कुपर हॉस्पिटल विलेपार्ले, यांच्या विद्यमाने आयोजित ‘जागतिक स्तनपान सप्ताह-२०२४'च्या निमित्ताने आयोजित केलेल्या आंतर महाविद्यालयीन भित्तिपत्रक स्पर्धेत (Poster Competition) शुभम पाटील (द्वितीय वर्ष एमबीबीएस) या विद्यार्थ्याने द्वितीय पारितोषिक पटकावले. यासाठी त्याला महाविद्यालयाच्या सामाजिक आणि रोगप्रतिबंधक विभागाने मार्गदर्शन केले.
सदर सर्व उपक्रमांसाठी विद्यार्थ्यांना उपअधिष्ठाता डॉ. स्वप्नाली कदम आणि डॉ. मिलिंद उबाळे तसेच अधिष्ठाता डॉ. राकेश बारोट यांनी प्रोत्साहन दिले.