महापालिकेच्या रुग्णांना नकार. रेफर रुग्णाला दारात अडवलं... फोर्टिसच्या बेपर्वाईला मनसेची चपराक
केडीएमसी शाळेतील विद्यार्थी गणवेश, शालेय साहित्यापासून वंचित
‘मनसे'चा इशारा
कल्याण : जुलै महिना अर्धा संपला तरी कल्याण-डोंबिवली महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांना अजुनही शाळेचा गणवेश आणि इतर साहित्य मिळाले नसल्याने या आठवडाभरात विद्यार्थ्याना शालेय साहित्य न मिळाल्यास केडीएमसी अधिकाऱ्यांना आणि शिक्षण विभागाच्या कर्मचाऱ्यांना शालेय गणवेश घालून शाळेत बसवू, असा इशारा ‘मनसे'चे जिल्हाध्यक्ष उल्हास भोईर यांनी दिला आहे.
केडीएमसी शाळेतील विद्यार्थी गणवेश आणि शालेय साहित्यापासून वंचित असल्याने केडीएमसी प्रशासनाचा निषेध व्यक्त करण्यासाठी ‘मनसे'चे विभाग अध्यक्ष कपिल पवार आणि शाखा अध्यक्ष गणेश लांडगे यांनी शालेय गणवेश घालून मी लाभार्थी? कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या शाळेत शिकणारा मी लाभार्थी? जून महिन्याच्या सुरुवातीला मला सर्व शालेय वस्तू मिळाल्या? असा उपहासात्मक बॅनर घेऊन कार्यालयात प्रवेश केला. यावेळी मनसैनिकांनी शिक्षण विभागाचे उपायुक्त प्रसाद बोरकर यांना शाळेचा गणवेश, बॅग, बूट, वह्या, पुस्तके, आदि शालेय साहित्य भेट दिले.
यावेळी प्रसंगी ‘मनसे'चे जिल्हाध्यक्ष उल्हास भोईर, विभाग अध्यक्ष कपिल पवार, शाखा अध्यक्ष गणेश लांडगे, रोहन आक्केवार, ‘महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेना'च्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष उर्मिला तांबे, चेतना रामचंद्रन, कल्याण महिला शहर अध्यक्षा तथा माजी नगरसेविका कस्तुरी देसाई, आदि पदाधिकारी उपस्थित होते.
दरम्यान, लवकरात लवकर शैक्षणिक साहित्य उपलब्ध करुन द्यावे. जेणेकरुन मुलांना अभ्यासाची गोडी निर्माण होऊन अभ्यास करण्यास सुरुवात करता येईल, अशी मागणी ‘मनसे'चे शाखा अध्यक्ष गणेश लांडगे यांनी महापालिका आयुक्तांकडे लेखी निवेदनाद्वारे केली होती. मात्र, निवेदन देऊन देखील शिक्षण विभागाने याकडे दुर्लक्ष केल्याने शाळेचा गणवेश घालून शिक्षण विभागाच्या उपायुवतांना शालेय वस्तू भेट दिल्या. तसेच विद्यार्थ्यांना लवकरात लवकर शालेय साहित्य उपलब्ध करुन न दिल्यास केडीएमसी अधिकाऱ्यांना शालेय गणवेश घालून शाळेत बसवू, असा इशारा यावेळी देण्यात आला.
आथिकदृष्ट्या दुर्बल आणि गोरगरीब कुटुंबातील मुले-मुली महापालिकेच्या शाळेत शिक्षण घेत असतात. त्यातच या विद्यार्थ्यांना अद्याप गणवेश, रेनकोट, बुट, मोजे, कंपास पेटी आणि इतर साहित्य वेळेत मिळालेले नाहीत. दरवर्षी शाळा सुरु झाल्यानंतर २ ते ४ महिन्यानंतर फक्त गणवेश उपलब्ध होतो. मागील वर्षी फक्त गणवेश आणि वह्या उपलब्ध झाल्या; पण रेनकोट, कंपास पेटी, बुट मोजे आणि दप्तर गेल्या ५ ते ७ वर्षापासून उपलब्ध झाले नाहीत. त्यामुळे याविषयी पालकांमधून अत्यंत नाराजी व्यक्त होत आहे.
-उल्हास भोईर, जिल्हाध्यक्ष-मनसे, कल्याण.