महापालिकेच्या रुग्णांना नकार. रेफर रुग्णाला दारात अडवलं... फोर्टिसच्या बेपर्वाईला मनसेची चपराक
साथरोग-किटकजन्य आजार टाळण्यासाठी काळजी घेण्याचे पनवेलकरांना आवाहन
पनवेल : पावसाळी कालावधीत विविध प्रकारचे किटकजन्य तसेच साथजन्य आजार उद्भवण्याची शक्यता असते. त्याअनुषंगाने नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन महापालिका आयुक्त मंगेश चितळे यांनी केले आहे. या पार्श्वभूमीवर खबरदारी घेण्याच्या दृष्टीने घनकचरा-आरोग्य आणि वैद्यकिय आरोग्य विभागामार्फत बांधकाम स्थळे, भंगार दुकानदार, नारळ विक्रेते, नर्सरी व्यवसायिक, सोसायट्यांना महापालिकेच्या वतीने नोटिसांचे वाटप करण्यात येत आहेत.
पावसाळ्यामध्ये साचलेल्या पाण्यांमध्ये डासांची उत्पत्ती होते. त्यामुळे डेंग्यू, मलेरिया आणि इतर किटकजन्य रोगाची लागण होऊ शकते. त्यामुळे बांधकामस्थळाच्या मालकांनी संबंधित परिसरांमध्ये इतरत्र पाणी साठू देऊ नये याची काळजी घ्यावी. तसेच सेंट्रींग प्लेटमध्ये आठवड्यातून एकदा ऑईल टाकावे. याठिकाणी डास उत्पत्ती होणार नाही याची दक्षता घेऊन प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन महापालिका तर्फे करण्यात आले आहे.
याचबरोबर नारळ विक्रेत्यांनी त्यांच्याजवळ असलेल्या रिकाम्या शहाळांमध्ये पाणी साठणार नाही, हातगाडी शेजारी रिकामे शहाळे साठणार नाही याची दक्षता घेण्याविषयीच्या सूचना देण्यात आल्या आहेत. नर्सरी व्यवसायिकांनी आपल्या नर्सरीबाहेर कुंड्या, मडकी, तत्सम वस्तुंमध्ये पाणी साठणार नाही, याची काळजी घ्यावी. या पध्दतीने टायर विक्रेत्यांनी जुने टायर, भंगार विक्रेत्यांनी देखील दुकानाबाहेर रिकामे डब्बे, ड्रम, प्लास्टिकच्या वस्तू काचेच्या बाटल्या अशा वस्तू ज्यामध्ये पाणी साठणार नाही याची काळजी घ्यावी. पाणी साठून डास उत्पत्ती होणाऱ्या वस्तूंची विल्हेवाट लावावी, अशा सूचना महापालिकेने नोटिसांच्या माध्यमातून दिल्या आहेत.
महापालिका हद्दीतील सर्व सोसायट्यांना त्यांच्या परिसरांमध्ये, टेरेसवर किंवा घरातील विविध वस्तुंमघ्ये पाणी साठत असल्यास त्याचा योग्य प्रकारे निचरा करुन त्याठिकाणी डास उत्पत्ती होणार नाही, याची खबरदारी घेण्याविषयी नोटिसा देण्याचे काम सुरु आहे. तसेच नागरिकांनी घरात पाणी साठविण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या पाण्याच्या टाकीला डास प्रतिबंधक जाळ्या लावाव्यात. पाण्याचे ड्रम आठवड्यातून एकदा कोरडे करावेत. जेणेकरुन अशा साहित्यमध्ये डास उत्पत्ती होणार नाही आणि मलेरिया, डेंगू रोगास आळा घालता येईल, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
दरम्यान, आजपर्यंत पनवेल महापालिका क्षेत्रातील सुमारे ३९८ बांधकाम स्थळे आणि ३,२६४ सोसायट्यांना साथरोग- किटकजन्य आजार टाळण्याकरिता नोटिसांचे वाटप करण्यात आले आहे.
पावसाळ्यात साठलेल्या पाण्यात डेंगू, मलेरिया आणि इतर किटकजन्य रोगाची लागण होऊ शकते. त्यामुळे नोटिसा दिलेली बांधकाम स्थळे, भंगार दुकानदार, नारळ विक्रेते, नर्सरी व्यवसायिक, सोसायट्यांनी महापालिकेने सांगितलेल्या सुचनांचे पालन केले नाही अन् संबधित ठिकाणी डेंग्यू, मलेरियाचे डास, त्यांची अंडी आढळल्यास संबंधितांविरुध्द दंडात्मक कारवाई करण्यात यावी. -मंगेश चितळे, आयुवत-पनवेल महापालिका.