अश्विनी बिद्रे हत्या प्रकरण : राजू पाटील चा जामीन अर्ज उच्च न्यायालयाने फेटाळला 

नवी मुंबई : सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे हत्याकांडातील आरोपी राजू पाटील यांचा जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाने पुन्हा एकदा फेटाळून लावला आहे. पनवेल सत्र न्यायालयात या खटल्याचे कामकाज थांबल्याचे कारण पुढे करत राजू पाटील यांनी मुंबई उच्च न्यायालयात जामीनासाठी अर्ज केला होता. मात्र अश्विनी बिद्रे हत्या प्रकरणाच्या खटल्याचे गांभीर्य लक्षात घेऊन न्यायालयाने हा जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. राजू पाटील याने यापूर्वी जामिनासाठी तीन वेळा अर्ज केला होते, तिन्ही वेळा न्यायालयाने त्याचा जामीन अर्ज फेटळून लावला आहे. दरम्यान, या खटल्याचा निपटारा येत्या 31 ऑगस्ट पर्यंत करण्यात यावा असे आदेशही उच्च न्यायालयाने पनवेल सत्र न्यायालयाला दिले आहे.

अश्विनी बिद्रे हत्याकांड प्रकरणाच्या खटल्यात पनवेल सत्र न्यायालयाने आतापर्यंत 85 साक्षीदार तपासले आहेत. साक्षीदार तपासण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर न्यायालयासमोर आरोपींचे 313 चे स्टेटमेंट सुरू आहे. हे स्टेटमेंट सुरू असतानाच आरोपी राजू पाटील याने मुंबई उच्च न्यायालयात जामिनासाठी धाव घेतली होती. न्यायालयाचे कामकाज थांबले असल्यामुळे आपल्याला जामीन मिळावा अशी मागणी त्याने केली होती. त्यावर विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांनी जोरदार आक्षेप घेतला. हा आक्षेप ग्राह्य धरून न्यायमूर्ती माधव जामदार यांनी राजू पाटील याचा जामीन अर्ज फेटाळून लावला. राजू पाटील याने मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या जामीन अर्जावर सुनावणी सुरू असताना न्यायालयाने या खटल्याचे कामकाज संपवण्यासाठी 31 ऑगस्ट ही डेडलाईन दिली आहे. त्यामुळे पनवेल सत्र न्यायालयाला आता तीन महिन्यातच हा खटला निकाली काढावा लागणार आहे. अभय कुरुंदकर आणि अन्य आरोपींनी अश्विनी बिद्रे यांची 11 एप्रिल 2016 रोजी मिरा रोड येथे हत्या केली होती. 

खटल्याचे कामकाज अंतिम टप्प्यात 

अश्विनी बिद्रे हत्याकांड प्रकरणी मुख्य आरोपी बडतर्फ वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकर, एकनाथ खडसे यांचा भाचा राजू पाटील, कुंदन भंडारी महेश फळणीकर हे चौघेजण सध्या न्यायालीन कोठडीत आहेत. न्यायालयाने या प्रकरणातील सर्व साक्षीदार तपासल्यानंतर आता आरोपींचे 313 चे स्टेटमेंट न्यायालयासमोर सुरू आहे हे स्टेटमेंट संपल्यानंतर दोन्ही बाजूच्या वकिलांचा युक्तिवाद होणार आहे. त्यामुळे खटल्याचे कामकाज आता अंतिम टप्प्यात आले आहे. 

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

 एपीएमसी फळ बाजारात समाईक जागेत व्यवसाय