महापालिकेच्या रुग्णांना नकार. रेफर रुग्णाला दारात अडवलं... फोर्टिसच्या बेपर्वाईला मनसेची चपराक
कोट्यवधींच्या बनावट वाहन नोंदणी रॅकेटचा पर्दाफाश
नवी मुंबई: विविध राज्यातून चोरण्यात आलेल्या ट्रक, हायवा, ट्रेलर या सारख्या वाहनांचे चेसीस आणि इंजिन क्रमांक यामध्ये फेरबदल करुन त्यांची परराज्यात नोंदणी करुन सदर वाहनांची महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात पुनर्नोंदणी करुन या वाहनांची विक्री करणाऱ्या रॅकेटचा नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. या कारवाईत गुन्हे शाखेने एकूण ५.५० कोटी रुपये किंमतीची २९ वाहने जप्त करुन या रॅकेटमध्ये सहभागी असलेल्या ९ आरोपींना अटक केली आहे. यात ३ आरटीओ अधिकाऱ्यांचा देखील समावेश आहे.
सदर रॅकटमध्ये सहभागी असलेले आरोपी विविध राज्यातून ट्रक, हायवा, ट्रेलर या सारख्या वाहनांची चोरी करुन त्याच्या चेसीस आणिा इंजिन क्रमांकात फेरबदल करुन या वाहनांची अरुणाचल प्रदेश, हिमाचल प्रदेश, मणिपूर, नागालँड या राज्यात नोंदणी करत होते. त्यानंतर सदर टोळी बनावट कागदपत्रांच्या आधारे त्याच वाहनांचे एन.ओ.सी. प्राप्त करुन त्याची महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात पुनर्नोंदणी करुन सदर वाहनांची लाखो रुपयांमध्ये विक्री करत होते. मार्च महिन्यामध्ये अशा प्रकारे बनागटगिरी करुन विकलेले २ ट्रक एपीएमसी मार्केट मध्ये आले असताना, नवी मुंबई पोलिसांच्या वाहन चोरी शोध पथकाने ते ताब्यात घेतले होते.
या गुन्ह्यात आंतरराज्य टोळीचा समावेश असल्याचे निदर्शनास आल्यामुळे गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त अमित काळे यांच्या आदेशानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चांदेकर, पोलीस उपनिरीक्षक संजय रेडडी, प्रताप देसाई यांचे विशेष तपास पथक तयार करण्यात आले होते. या पथकाने केलेल्या तपासात जावेद अब्दुला शेख उर्फ मणीयार या गुन्ह्यातील मुख्य आरोपी असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली. त्यानंतर पोलिसांनी आरोपी जावेद याला सहकार्य करणाऱ्या ५ आरोपींना नागपूर, अमरावती धुळे, बुलढाणा, सुरत, औरंगाबाद या भागात शोध घेऊन त्यांना देखील या गुन्ह्यात अटक केली आहे.
पोलिसांनी केलेल्या तपासात अमरावती येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयातील सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी, मोटार वाहन निरीक्षक आणि सहाय्यक वाहन निरीक्षक यांनी आरोपींशी संगनमत करुन वाहने समक्ष हजर नसताना त्यांची पुनर्नोंदणीची कार्यवाही केल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे सदर तिघांना देखील अटक करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे पोलिसांनी नागप्रूर येथील आरटीओ एजंटला देखील अटक केली आहे.
जावेद मणियार याच्या विरोधात नवी मुंबई, ठाणे, मिराभाईंदर, औरंगाबाद आयुक्तालय आणि धुळे येथे चोरी, फसवणुकीचे एकूण १० गुन्हे दाखल आहेत. जावेद अब्दुल्ला शेख याचा उत्तर प्रदेश आणि हरियाणा राज्यातील ४ गुन्ह्यात सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे. तसेच आरोपी रफीक मंसुरी याच्यावर ३ गुन्हे दाखल आहेत.
अटक आरोपींची नावे...
जावेद अब्दुल्ला शेख उर्फ मनियार (४९), मोहम्मद अस्लम बाबा शेख (४९), शिवाजी आसाराम गिरी (४८), अमित सिंग उर्फ मोनू राजपूत (३३), रफीक शेख दिलावर मन्सुरी उर्फ रफीक मामू (४२), वरुण रमेश जिभेकर उर्फ सील (४१), सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक भाग्यश्री पाटील (४३), निरीक्षक गणेश वरुटे (३५), एआरटीओ सिध्दार्थ विजय सिंग ठोके (३५).
या गुह्यातील मुख्य आरोपी जावेद अब्दुला याने देशभरातील विविध राज्यातून चोरी करुन आणलेल्या ट्रक, हायवा, ट्रेलर या वाहनांच्या चेसीस आणि इंजिन क्रमांकात फेरबदल करुन, वाहन निमिर्ती करणाऱ्या कंपनीप्रमाणे ॲल्युमिनियमच्या इंजिन नंबर प्लेट बनवून घेतल्याचे तपासामध्ये निष्पन्न झाले आहे. तसेच जावेद अब्दुला शेख याने त्याच्या इतर साथीदारांच्या मदतीने गाडीवरील मुळ चेसीस नंबर खोडून त्यावर नवीन दुसरा चेसीस नंबर टाकून सदर वाहनांची नागपूर, अमरावती आणि इतर आरटीओ कार्यालयात पुनर्नोंदणी करुन घेतल्याचे आढळून आले आहे.
मुख्य आरोपी जावेद अब्दुला शेख उर्फ मणीयार याने स्वतःचे २ पॅनकार्ड बनविले असून त्याने त्याच्या साथीदाराचे वेगवेगळ्या पत्यांचे आधारकार्ड तयार करुन काही वाहनांची आरटीओ मध्ये पुनर्नोंदणी केल्याचे आढळून आले आहे. तसेच एकच मोबाईल नंबरचा वापर करुन इतर वाहन मालकांचे नावाची आरटीओ मध्ये नोंदणी करुन घेतल्याचे देखील निष्पन्न झाले आहे.