वाहतूक नियमांचे उल्लंघन; १३८ बेशिस्त रिक्षा चालकांवर कारवाई  

नवी मुंबई : बेजबाबदारपणे रिक्षा चालवून वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या रिक्षा चालकांविरोधात नवी मुंबई वाहतूक पोलीस विभागाने विशेष मोहीम सुरु केली आहे. या विशेष मोहिमेंतर्गत वाहतूक पोलिसांनी १० एप्रिल रोजी एका दिवसामध्ये वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या १३८ रिक्षा चालकांविरोधात कारवाई केली आहे. त्यामुळे वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या रिक्षा चालकाचे धाबे दणाणले आहेत.    

नवी मुंबई क्षेत्रात असलेले काही रिक्षा चालक वाहतुकीचे नियम न पाळता बेजबाबदारपणे रिक्षा चालवत असल्याचे वाहतूक पोलीस विभागाच्या निदर्शनास आले होते. तसेच अनेक प्रवाशांनी बेजबाबदारपणे रिक्षा चालविणाऱ्यांविरुध्द तक्रारी केल्याने नवी मुंबई पोलीस आयुक्तालय अंतर्गत कार्यरत असलेल्या १६ वाहतूक शाखांच्या वतीने रिक्षा युनियन, रिक्षा चालक-मालक यांच्या सोबत बैठक घेऊन त्यांना वाहतूक नियमांचे पालन करण्यासंदर्भात आवाहन करण्यात आले होते. मात्र, त्यानंतर देखील काही रिक्षा चालक वाहतूक नियमांचे उल्लंघन करुन बेजबाबदारपणे रिक्षा चालवत असल्याचे आढळून आले आहे.  

त्यामुळे नवी मुंबई वाहतूक विभागाने बेशिस्त रिक्षा चालकांविरुध्द विशेष मोहिमेला सुरुवात केली आहे. या विशेष मोहिमेदरम्यान नवी मुंबई वाहतूक पोलिसांच्या १६ शाखांनी १० एप्रिल रोजी आपापल्या हद्दीत वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या १३८ रिक्षा चालकांवर कारवाई केली आहे.


यापुढील काळात देखील रिक्षा चालकांविरोधातील कारवाई सुरुच राहणार असल्याचे नवी मुंबई वाहतुक विभागाचे पोलीस उपायुक्त तिरुपती काकडे यांनी स्पष्ट केले आहे. तसेच रिक्षा चालक-मालक यांनी वाहतुकीच्या नियमांचे पालन करुन वाहतूक सुरळीत ठेवण्यास नवी मुंबई वाहतूक विभागास सहकार्य करावे, असे आवाहन देखील करण्यात येत आहे.
-तिरुपती काकडे, पोलीस उपायुवत-वाहतूक विभाग, नवी मुंबई.

रिक्षा भाडे नाकारणाऱ्यांनो सावधान!  
 कोपरखैरणे वाहतूक शाखेच्या वतीने सलग ८ दिवस कोपरखैरणे, घणसोली मधील रिक्षा थांबे तसेच परिसरातील रिक्षा चालक-मालक संघटनांची बैठक घेऊन त्यांच्यामध्ये वाहतुकीच्या नियमांबाबत प्रबोधन करण्यात आले. परंतु, त्यानंतर देखील काही रिक्षा चालक नियमांचे उल्लंघन करत असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे कोपरखैरणे वाहतूक शाखेचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वास भिंगारदिवे आणि त्यांच्या अंमलदारांनी २ दिवस विशेष मोहीम राबवून वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ८० पेक्षा जास्त रिक्षा चालकांवर कारवाई केली. यात प्रामुख्याने प्रवासी भाडे नाकारणाऱ्या १७ रिक्षा चालकांवर देखील कारवाई करण्यात आली. 

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

लोकसभा निवडणुकीसाठी नवी मुंबई पोलीस सज्ज