वाशीतील बार मधील कर्मचाऱ्याच्या हत्या प्रकरणातील त्रिकुट जेरबंद

नवी मुंबई  : वाशीतील जुहूगाव येथे गुरूवारी सकाळी बार मधील कर्मचाऱ्याच्या झालेल्या हत्या प्रकरणाचा छडा लावण्यात पोलीसांना यश आले आहे. या हत्या प्रकरणात पोलिसांनी मोहम्मद अली मुबारक शेख (21), शाहनवाज हानिफ शेख (22) व इमरान याकूब अली शेख (33) या तीन मारेकऱ्यांना अटक केली आहे. लुटमार करण्याच्या उद्देशाने या त्रिकुटाने ही हत्या केल्याचे तपासात आढळून आले आहे.

वाशी जुहूगाव येथील कपिल किनारा बार मध्ये काम करणारा मुकेश उर्फ मंटु कुमार यादव (26) हा गुरूवारी सकाळी 5 वाजण्याच्या सुमारास कोपरखैरणे येथे आपल्या घरी जाण्यासाठी  बार लगत बसची वाट पाहत बसला होता. यावेळी  मोटारसायकलवरून आलेल्या दोघा हल्लेखोरांनी मंटु कुमार यादव याच्या हातामधील पिशवी खेचण्याचा प्रयत्न केला. मात्र मुकेशने त्याला विरोध केल्याने दुसऱ्या हल्लेखोराने त्याच्याजवळ असलेल्या धारदार शस्राने मंटु कुमार यादव याच्या छातीवर तसेच कपाळावर व हातावर वार करून त्याची हत्या केली. यावेळी मंटु कुमार यादव याची आरडा ओरड ऐकून बार मधील वॉचमन दिनेश यादव (41) हा हल्लेखोरांना पकडण्यासाठी गेला असता, सदर हल्लेखोरांनी त्याच्यावर देखील शस्त्राने वार करून मोटारसायकलवरून पलायन केले होते.

सदर गुन्हयाचे गांभिर्य लक्षात घेवुन या हत्या प्रकरणातील आरोपींचा शोध घेण्यासाठी ३ वेगवेगळे पथक तयार करण्यात आलेले होते. तसेच मध्यवर्ती गुन्हे शाखेकडून देखील या गुन्हयाचा संमातर तपास करण्यात येत होता. त्यांनतर पोलिसांनी आरोपींचां घटनास्थळापासुन सीसीटीव्ही कॅमे-याव्दारे व तांत्रिक तपासाव्दारे शोध घेतला असता सदरचा गुन्हा हा तीन आरोपींनी केल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर पोलिसांनी आरोपीचा मागोवा घेतला असता सदरचे आरोपी हे मुंब्रा परिसरात गेल्याचे निदर्शनास आल्यानंतर पोलीस पथकाने मुंब्रा भागातून  मोहमद अली मुबारक शेख व शहानवाज हानिफ शेख या दोघांना गुन्ह्यात वापरलेल्या गाडीसह ताब्यात घेतले. त्यानंतर पोलिसांनी त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी त्यांचा मित्र ईमरान याकुब अली शेख याच्या मदतीने सदरची हत्या केल्याचे कबूल केले. त्यानंतर गुन्हे शाखा मध्यवर्ती शाखेने ईमरान याकुब अली शेख याला मालाड येथुन ताब्यात घेतले. 

पंकज डहाणें (पोलीस उपआयुक्त परिमंडळ-1) 

सदरची घटना लुटमार करण्याच्या उद्देशाने झाली असून या हत्या प्रकरणातील तिन्ही आरोपींना 24 तासाच्या आत अटक करण्यात यश आले आहे. यातील इमरान याकूब अली शेख हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर मालाड,ओशिवरा, गोरेगाव व बोरिवली पोलीस ठाण्यात विविध प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. 

 

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

वेलची चोरल्याच्या आरोपावरुन कामगाराला मारहाण करुन दिली अमानुष वागणूक