बांग्लादेशी नागरिकासह ४ गुन्हेगारांची धरपकड  

नवी मुंबई : नवी मुंबई पोलिसांनी तुर्भे एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीत रात्री कोंबींग ऑपरेशन राबवून १ बांग्लादेशी नागरिकासह गांजा बाळगणारा तसेच तलवार बाळगणारे मिळून एकूण ४ गुन्हेगारांची धरपकड केली. याशिवाय पोलिसांनी रेकॉर्डवरील आरोपी, पाहिजे आरोपी, गुंड, हिस्ट्रीशीटर, संशयीत व्यक्तींची तपासणी करुन त्यांच्यावर प्रतिबंधक कारवाई केली.

दरम्यान, नवी मुंबई पोलीस आयुक्तालय हद्दीतील परिमंडळ-१ मधील वाढती गुन्हेगारी आणि अंमली पदार्थाचे जाळे उध्वस्त करण्यासाठी पोलिसांनी कोंबींग ऑपरेशन सुरु केल्यामुळे गुन्हेगारांचे तसेच अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.  

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता १६ मार्च पासून लागू झाल्याने नवी मुंबई पोलिसांनी रेकॉर्डवरील आरोपी, पाहिजे आरोपी, गुंड, हिस्ट्रीशीटर तसेच अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्यांची झाडाझडती सुरु केली आहे. त्यासाठी नवी मुंबई पोलिसांनी वेगवेगळ्या भागामध्ये अचानक कोंबींग ऑपरेशन राबवून गुन्हेगार आणि बेकायदेशीर कृत्य करणाऱ्यांची धरपकड सुरु केली आहे. नवी मुंबई पोलिसांनी १६ मार्च रोजी तुर्भे एमआयडीसी हद्दीत सायंकाळी ६ ते रात्री ११ या वेळेत पर्यंत कोंबींग ऑपरेशन राबविले. यासाठी नवी मुंबई आयुक्तालयातील इतर पोलीस ठाणे मधील अतिरिक्त मनुष्यबळ तसेच राईट कंट्रोल पोलीस पथक असे एकुण २६ अधिकारी आणि १६५ अंमलदार मागवण्यात आले होते. त्यानंतर या पोलिसांची ८ तुकडीमध्ये विभागणी करुन २ ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली. तर उर्वरीत ६ पथकांच्या माध्यमातून वेगवेगळ्या ठिकाणी कोंबींग ऑपरेशन राबविण्यात आले.    
या कोंबींग ऑपरेशन दरम्यान बगाडे कंपनीच्या पाठीमागे, इंदिरानगर येथे राहूल रंगनाथ दांडगे (वय-४१) १० किलो २०० ग्रॅम वजनाचा गांजा घेऊन वावरताना आढळून आला. त्यामुळे पोलिसांनी त्याला एनडीपीएस ॲक्ट नुसार गांजासह अटक केली.  

यावेळी तुर्भे एमआयडीसीतील भारत नगर येथे बेकायदेशीर वास्तव्यास असलेला बांगलादेशी नागरिक अनारुल अश्रफ सरदार (वय-४१) पोलिसांच्या हाती लागल्याने पोलिसांनी त्याला अटक केली.

या तपासणी मोहीमेत लोकेश देवेद्रप्पा मायानसुर (वय-२८) तुर्भे स्टोअर मधील पाण्याच्या टाकीजवळ स्टीलची तलवार घेऊन फिरताना सापडला. तसेच अवनाश दासू राठोडे (वय-२५)  के.के.आर. रोड, तुर्भे स्टोअर परिसरात लोखंडी तलवार घेऊन फिरताना आढळुन आला. या दोघांविरोधात भारतीय हत्यार कायद्यानुसार गुन्हा दाखल करुन दोघांना अटक करण्यात आली आहे. 

 या कोंबींग ऑपरेशन दरम्यान, हद्दपार केलेला आरोपी नितीन हरी राजपूत के.के.आर रोड, तुर्भे स्टोअर भागातील पाण्याच्या टाकीजवळ पोलिसांच्या हाती लागला असून, त्याच्या विरोधात महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम १४२ अन्वये गुन्हा दाखल करुन त्याला ताब्यात घेण्यात आले आहे.

या कोबींग ऑपरेशन दरम्यान  २७  हिस्ट्रीशिटर, गुंडा रजिस्टर मधील १६ आरोपींची झाडाझडती घेण्यात आली. एकुण १५ व्यवतींवर कोपटाअंतर्गत कारवाई करण्यात आली. तसेच एनडीपीएस अंतर्गत ५ व्यवतींवर कारवाई करण्यात आली. याशिवाय नाकाबंदी लावण्यात आलेल्या २ ठिकाणी मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या १०९ वाहन चालकांवर कारवाई करुन त्यांच्याकडून ८७ हजार १०० रुपये दंड वसूल करण्यात आला. तसेच १३ जणांना समन्स बजावून १ जणावर बेलेबल वॉरंटची कारवाई करण्यात आली आहे. तसेच पाहिजे असलेल्या आरोपींची तपासणी करुन २ आरोपींवर कारवाई करण्यात आली.

सदर कारवाई नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्या निर्देशानुसार नवी मुंबई पोलीस उपआयुक्त (परिमंडळ-१) पंकज डहाणे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. 

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

 न्हावाशेवा परिसरातील गावठी दारुचे २ अड्डे उध्वस्त