नोकरीसाठी गेलेल्या २ तरुणांची  कुवेतच्या तुरुंगातून सुटका  

नवी मुंबई : इराणमध्ये जहाजावर नोकरीसाठी गेलेले नाशिक मधील २ तरुण कुवेतच्या किनाऱ्यावर बुडालेल्या जहाजातून सुदैवाने बचावले होते. मात्र, त्यांच्याकडील पासपोर्ट आणि इतर कागदपत्रे हरवल्यामुळे तेथील तरुंगात ते अडकून पडले होते. नवी मुंबईतील ‘ऑल इंडिया सिफेरर्स युनियन'ने केलेल्या पाठपुराव्यामुळे या दोन तरुणांची सुटका झाली आहे. त्यानुसार १ मार्च रोजीे दोन्ही तरुण मुंबईत सुरखरुप परतले आहेत.  

अविष्कार जगताप आणि निवृत्ती बागुल अशी सुटका झालेल्या तरुणांची नावे असून दोघेही नाशिक येथे राहणारे आहेत. या दोघांना डिसेंबर २०२३ मध्ये एजंटने इराण देशात नोकरीसाठी पाठवले होते. इराण मधील जहाजावर काम करत असताना १९ जानेवारी रोजी कुवेतच्या समुद्र किनाऱ्यावर सदर जहाज बुडाले होते. त्यावेळी जहाजावरील सर्वजण बुडाले; मात्र अविष्कार आणि निवृत्ती दोघेही बोटीतून सुखरुप किनाऱ्यावर पोहोचले होते. त्यानंतर कुवेत मधील पोलिसांनी त्यांना रुग्णालयात दाखल केले. मात्र, जहाज बुडाल्यामुळे अविष्कार आणि निवृत्ती या दोघांचे पासपोर्ट, इतर कागदपत्रे हरविल्याने त्यांच्याकडे कोणतीही कागदपत्रे नसल्यामुळे त्यांना तुरुंगात टाकण्यात आले.  

सदर बाब अविष्कार आणि निवृत्ती यांच्या कुटुंबियांना समजल्यानंतर त्यांनी या दोघांना सोडविण्यासाठी वेगवेगळ्या माध्यमातून प्रयत्न सुरु केले होते. या दोघांच्या कुटुंबियांना ऑल इंडिया सिफेरर्स युनियन बाबत माहिती मिळाल्यानंतर त्यांनी ‘युनियन'चे कार्याध्यक्ष अभिजित सांगळे आणि अध्यक्ष संजय पवार यांच्याशी संपर्क साधून अविष्कार आणि निवृत्ती या दोघांना सोडविण्यासाठी मदत करण्याची विनंती केली. त्यानंतर ‘युनियन'ने कुवेत मधील भारतीय  दुतावास आणि परराष्ट्र मंत्रालयाशी संपर्क साधून त्यांच्याकडे पाठपुरावा केला. त्यामुळे भारतीय दुतावासाने या दोन्ही तरुणांना तुरुंगातून बाहेर काढून त्यांना भारतात पाठवून दिले. १ मार्च रोजी सदर दोन्ही तरुण मुंबईत दाखल झाल्यानंतर त्यांनी प्रथम नवी मुंबईत येऊन ‘सिफेरर्स असोसिएशन'च्या पदाधिकाऱ्यांचे आभार मानले.  

परदेशात नोकरीसाठी पाठवण्यात सक्रिय असलेले काही बोगस एजंट नोकरीची गरज असलेल्या तरुणांना इराण, मलेशिया, दुबई, सौदी अरेबिया सारख्या देशांमध्ये पाठवतात. या बोगस दलालांच्या माध्यमातून जहाजावर गेलेल्या तरुणांची कागदपत्रे काढून घेतली जातात. त्यामुळे अनेक तरुण तेथे अडकतात. अशा प्रकारे तरुणांना गुलामगिरीत ढकलणाऱ्या दलालांची चौकशी करुन त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी ‘सिफेरर्स युनियन'ने नवी मुंबई पोलीस आयुक्तांकडे केल्याची माहिती ‘युनियन'चे अध्यक्ष संजय पवार यांनी दिली. 

 

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

कोपरखैरणे पोलिसांचे कोबींग ऑपरेशन