शाळेत शिक्षक येताहेत लेट

नवीन पनवेल : पनवेल तालुक्यातील राजिप शाळा धामोळे या आदिवासी वाडीवरील शाळेतील शिक्षक वेळेत शाळेमध्ये हजर राहत नसल्याबाबत गटविकास अधिकारी आणि
गटशिक्षण अधिकारी पंचायत समिती, पनवेल यांच्याकडे ‘आदिवासी ठाकूर समाज संघटना-पनवेल तालुका'तर्फे तक्रार करण्यात आली आहे. तसेच या विषयाची गांभीर्याने दखल घेऊन संबंधितांवर योग्य ती कार्यवाही करण्याची मागणी पत्राद्वारे करण्यात आली आहे.

धामोळे (खारघर) आदिवासी वाडीवरील शाळेत ४ शिक्षक कार्यरत आहेत. शनिवारी शाळेची वेळ सकाळी ७.३०ची असते. त्यापैकी एक शिक्षिका ८.३० वाजता हजर झाल्याचे ‘आदिवासी ठाकूर समाज संघटना'चे म्हणणे आहे. उर्वरित शिक्षक शाळेवर हजर नव्हते. असे वारंवार घडत असल्याचा आरोप ‘संघटना'ने केला आहे. त्यानंतर शाळा ८.३० वाजता उघडण्यात आली. धामोळे आदिवासी वाडीवर शिक्षकांचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप सदर पत्रात करण्यात आला आहे. अशा शिक्षकांच्या हलगर्जीपणामुळे आदिवासी समाज शिक्षणापासून वंचित राहतो आणि त्यांच्या वागण्यामुळे आदिवासी वाड्यांवरील दुर्गम भागातील शाळा बंद पडत आहेत, असे गटशिक्षण अधिकाऱ्यांना दिलेल्या पत्रात नमूद करण्यात आले आहे.शाळेतील शिक्षकांनी कर्तव्यात कसूर केल्याबद्दल ‘आदिवासी ठाकूर समाज'च्या वतीने निषेध देखील करण्यात आला. 

याप्रसंगी ‘समाज'चे अध्यक्ष धर्मा वाघ, खजिनदार चंद्रकांत सांबरी, कार्याध्यक्ष अर्जुन घुटे, सहखजिनदार जना घुटे, संपर्कप्रमुख राम चौधरी, कोषाध्यक्ष दीपक वीर, समाधान पारधी, बाळाराम पारधी, मारुती वाघमारे, जया कातकरी, प्रदीप कुरके, आदित्य शिंदे, सुधीर ओझे यांच्यासह अनेक जण उपस्थित होते.

Read Previous

पाचवी व आठवीच्या स्कॉलरशीप परीक्षेत नमुंमपा शाळेतील 49 विद्यार्थ्यांचे कौतुकास्पद यश

Read Next

‘नमुंमपा आंतरशालेय सांस्कृतिक चषक महोत्सव' जल्लोषात संपन्न