‘नमुंमपा आंतरशालेय सांस्कृतिक चषक महोत्सव' जल्लोषात संपन्न

नवी मुंबई : महापालिका आयुवत राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनानुसार नवी मुंबई महापालिका ‘क्रीडा-सांस्कृतिक विभाग'च्या वतीने विष्णुदास भावे नाट्यगृह येथे संपन्न झालेल्या ‘महापालिका आंतरशालेय पथनाट्य, गायन, नृत्य स्पर्धा'मध्ये सर्वाधिक १२५ गुण संपादन करीत शाळा क्र.१८, सानपाडा या शाळेने यावर्षीचा नमुंमपा आंतरशालेय सांस्कृतिक चषक पटकाविला.

या स्पर्धेतील विजेत्यांना महापालिका अतिरिक्त आयुक्त विजयकुमार म्हसाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत पारितोषिके प्रदान करण्यात आली. याप्रसंगी ‘क्रीडा-सांस्कृतिक कार्य विभाग'च्या उपायुक्त ललिता बाबर, गायन स्पर्धा परीक्षक तथा सुप्रिसध्द गायक अनिरुध्द जोशी, नृत्य स्पर्धा परीक्षक तथा ‘सोनी मराठी'वरील सावित्रीज्योती मालिकेत सावित्रीबाई फुले यांची भूमिका करणाऱ्या अभिनेत्री-नृत्यांगना अश्विनी कासार, परिमंडळ-१ चे उपायुक्त सोमनाथ पोटरे, भांडार विभाग उपायुक्त मंगला माळवे, महापालिका सचिव चित्रा बाविस्कर, शिक्षणाधिकारी अरुणा यादव, क्रीडा अधिकारी अभिलाषा म्हात्रे, शिक्षण विस्तार अधिकारी सुलभा बारघरे, कल्पना गोसावी आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

आंतरशालेय ‘पथनाट्य स्पर्धा'मध्ये ७२ शाळांनी सहभाग घेतला. स्वच्छता, महिला सक्षमीकरण, व्यसनमुक्ती, इंटरनेटचे जाळे अशा प्रकारच्या सात सामाजिक आशयाच्या विषयांवर शाळांनी पथनाट्य सादर करताना आपल्या परिसरात किमान ५ प्रयोग करावेत, अशी अट या स्पर्धा सहभागासाठी होती. त्यामुळे प्राथमिक फेरीत सहभागी होण्यापूर्वीच महापालिका क्षेत्रात विविध ठिकाणी १२०० हून अधिक विद्यार्थ्यांनी ३५० हून अधिक प्रयोगातून विविध विषयांवर जनजागृती केली होती. सुप्रसिध्द अभिनेते वैभव सातपुते यांनी प्राथमिक फेरीचे परीक्षण करुन २० शाळांची अंतिम फेरीसाठी निवड केली. यामधून जेष्ठ अभिनेते रमेश वाणी यांनी अंतिम फेरीचे परीक्षण करताना शाळा क्र.१०४ राजर्षी शाहू महाराज विद्यालय, रबाले या शाळेची प्रथम पारितोषिकासाठी निवड केली. शाळा क्र.७१ इंदिरानगर यांनी द्वितीय तर शाळा क्र.११३ महापे यांनी तृतीय क्रमांक पटकाविला. शाळा क्र.३३ पावणे आणि शाळा क्र.१२० दिवा-ऐरोली या शाळा उत्तेजनार्थ पारितोषिकांच्या मानकरी ठरल्या.

अशाच प्रकारे आंतरशालेय ‘गायन स्पर्धा'मध्ये १६०० हून अधिक मुलांनी सहभागी होत गायनकला पेश केली. यामध्ये इयत्ता १ ली ते ५ वी या वैयक्तिक गायन लहान गटात २१ स्पर्धकांतून ऋत्विक राऊत (शाळा क्र.३१, कोपरखैरणे), रेहाना मुल्ला (शाळा क्र.१८, सानपाडा), सोहम ननावरे (शाळा क्र.१, बेलापूर) यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक मिळवला. तसेच ६ वी ते १० वी या वैयक्तिक गायन मोठ्या गटामध्ये ३३ स्पर्धकांमधून नयन थोरात-प्रथम (शाळा क्र.१०५, घणसोली), रोहिणी झोरे-द्वितीय (शाळा क्र.११६, सानपाडा), श्रावणी गायकवाड-तृतीय (शाळा क्र.३५, से.५ कोपरखैरणे) यांनी पारितोषिके संपादन केली. १ ली ते ५ वी या समुह गायन लहान गटात २७ स्पर्धकांतून शाळा क्र.३८ कोपरखैरणे, शाळा क्र.६ करावे, शाळा क्र.९२ कुकशेत (इंग्रजी माध्यम) या शाळांनी पारितोषिके पटकावली. त्याचप्रमाणे ६ वी ते १० वी या समुह गायन मोठ्या गटात ४२ स्पर्धकांतून शाळा क्र.९४ कोपरखैरणे (सीबीएसई), शाळा क्र.३६ कोपरखैरणे गांव, शाळा क्र.३३ पावणे या शाळांनी पारितोषिके पटकाविली. सुप्रसिध्द गायक ऋग्वेद देशपांडे यांनी प्राथमिक फेरीचे तर नामांकीत गायक अनिरुध्द जोशी यांनी अंतिम फेरीचे परीक्षण केले. 

आंतरशालेय ‘नृत्य स्पर्धा'मध्ये २००० हून अधिक मुलांनी सहभागी होत नृत्यकला सादर केली. यामध्ये १ ली ते ५ वी या वैयक्तिक नृत्य लहान गटात २३ स्पर्धकांतून श्रेया वानखेडे-प्रथम (शाळा क्र.९५, तुर्भे स्टोअर), परी कुमार-द्वितीय (शाळा क्र.७७, यादवनगर ऐरोली), आयेशा शेख-तृतीय (शाळा क्र.७६ घणसोली) यांनी पारितोषिव्ोÀ मिळवली. तसेच ६ वी ते १० वी या वैयक्तिक नृत्य मोठ्या गटात ३३ स्पर्धकांमधून स्वरा रेडीज-प्रथम (शाळा क्र.४२, घणसोली), दिप्ती मोहोड-द्वितीय (शाळा क्र.९२, कुकशेत- इंग्रजी माध्यम), दिव्या उंड्रे-तृतीय (शाळा क्र.३४, श्रमिकनगर) यांनी विजयश्री मिळवली. १ ली ते ५ वी या समुह नृत्य लहान गटात २९ स्पर्धकांमधून शाळा क्र.५ दारावे, शाळा क्र.१८ सानपाडा आणि शाळा क्र.११ कुकशेत या शाळांनी पारितोषिके पटकाविली. त्याचप्रमाणे ६ वी ते 10 वी या समुह नृत्य मोठ्या गटात ५५ स्पर्धकांमधून शाळा क्र.४७ रबाले, शाळा क्र.३५ कोपरखैरणे, शाळा क्र.१८ सानपाडा यांनीही पारितोषिके पटकाविली. नृत्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचे परीक्षण कथ्थक नृत्यांगना प्रिया मुळे समर्थ आणि अंतिम फेरीचे परीक्षण अभिनेत्री-नृत्यांगना अश्विनी कासार यांनी केले.

ज्या शाळेला प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले त्या शाळेस १०० गुण, द्वितीय क्रमांक मिळालेल्या शाळेस ५० गुण आणि तृतीय क्रमांक प्राप्त झालेल्या शाळेस २५ गुण प्रदान करण्यात आले. यामध्ये सर्वात जास्त १२५ एकूण गुण संपादन करणाऱ्या शाळा क्र.१८, सानपाडा या शाळेला नमुंमपा आंतरशालेय सांस्कृतिक चषक मान्यवरांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला.

 

Read Previous

पाचवी व आठवीच्या स्कॉलरशीप परीक्षेत नमुंमपा शाळेतील 49 विद्यार्थ्यांचे कौतुकास्पद यश

Read Next

राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा