हिंदू नावाने बनावट कागदपत्र बनवून वास्तव्य; बांग्लादेशी दाम्पत्य गजाआड

नवी मुंबई : बांग्लादेशी नागरिक आणि मुस्लीम असल्याची ओळख लपविण्यासाठी बांग्लादेशी दाम्पत्याने आपले मुस्लीम नाव बदलून हिंदू नावाचे बनावट भारतीय आधारकार्ड, पॅनकार्ड, रेशनकार्ड, निवडणूक ओळखपत्र, बँक पासबुक बनवून घेतल्याचा धक्कादायक प्रकार पनवेलमध्ये उघडकीस आला आहे. ‘दशतवाद विरोधी पथक'च्या नवी मुंबई युनिटने या दोघांची धरपकड केल्यानंतर सदर प्रकार उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे मागील चार वर्षापासून सदर बांग्लादेशी दाम्पत्य आपली खरी ओळख लपवून पनवेल भागात बेकायदेशीररित्या रहात असल्याचे उघडकीस आले आहे. ‘दशतवाद विरोधी पथक'ने या दोघांनी तयार करुन घेतलेले भारतातील बनावट कागदपत्रे जप्त करुन दोघांना अटक केली आहे.

पनवेल तालुक्यातील कोलवाडी भागातील पोपेटा बिल्डींग मध्ये बांग्लादेशी नागरिक बेकायदेशीररित्या वास्तव्यास असल्याची माहिती ‘दशतवाद विरोधी पथक'च्या नवी मुंबई युनिटला मिळाली होती. या माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रतिभा शेंडगे, पोलीस निरीक्षक तुकाराम नलावडे, पोलीस उपनिरीक्षक मिरा लाड, विजयकुमार पाटील आणि त्यांच्या पथकाने १५ फेब्रुवारी रोजी दुपारी पनवेल तालुक्यातील कोलवाडी मधील पोपेटा बिल्डींगमधील घरावर छापा मारला होता.  

त्यानंतर पोलिसांनी सदर घरामध्ये राहत असलेल्या रंजन सत्यरंजन दास उर्फ अस्लम कुडुस शेख (३५) याच्याकडे चौकशी केली असता, तो आणि त्याची पत्नी हुसना अस्लम शेख उर्फ मलिना रंजन दास (३४) या दोघांनी २०१५ मध्ये बांग्लादेशातील गरीबीस कंटाळून घुसखोरीच्या मार्गाने भारत-बांग्लादेश सीमेवरील गस्ती पथकाची नजर चुकवून भारतात प्रवेश केल्याचे सांगितले. तसेच या दोघांनी बांग्लादेशी नागरिक असल्याची आणि भारतामध्ये काम मिळविण्यासाठी मुस्लीम असल्याची ओळख लपवून हिंदू नावाने बनावट आधारकार्ड, पॅनकार्ड, भारतीय निवडणूक ओळखपत्र, बँकेचे पासबुक आदि कागदपत्रे बनवून घेतल्याची कबुली दिली.  

त्यानंतर ‘दशतवाद विरोधी पथक'ने या दोघांविरोधात पनवेल तालुका पोलीस ठाण्यात बनावट कागदत्रे तयार करुन फसवणुक केल्याप्रकरणी तसेच विदेशी व्यक्ती अधिनियम, पारपत्र अधिनियमानुसार गुन्हा दाखल करुन दोघांना अटक केली आहे. या दोघांना बनावट आधारकार्ड, पॅनकार्ड, निवडणूक ओळखपत्र, रेशनकार्ड आणि बँक पासबुक बनवुन देणाऱ्यांंचा पोलिसांकडून शोध घेण्यात येत आहे.  

सदर कारवाईत अटक करण्यात आलेला बांग्लादेशी नागरिक अस्लम कुडुस शेख २०१६ मध्ये पनवेल परिसरात मजुरीचे काम करत असताना, त्याची ओळख पनवेलच्या कोलवाडी परिसरात घरकाम करुन राहणाऱ्या बांग्लादेशी महिला हुसना अस्लम शेख हिच्यासोबत झाली होती. ती देखील भारतामध्ये अवैधरित्या प्रवेश करुन वास्तव्य करत असल्याचे समजल्यानंतर त्या दोघांनी २०१६ मध्ये लग्न केले. त्यानंतर दोघे जण मजुरी आणि घरकाम करुन मागील ४ वर्षापासून राहत असल्याचे आढळुन आले आहे. सदर दाम्पत्य बांग्लादेशातील आपल्या आई-वडील आणि नातेवाईकांना संपर्क साधण्यासाठी इमो या ॲप्लिकेशनचा तसेच व्हॉटस्‌ॲप कॉलींगचा वापर करत असल्याचे तपासात आढळून आले आहे. 

 

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

अश्विनी बिद्रे हत्याकांड खटल्यात पुरावे भक्कम