मुख्य सचिव करीर यांनी साधला महापालिका विद्यार्थ्यांशी संवाद

ठाणे : सर, तुम्हाला वाचायला काय आवडते? पुस्तकाच्या मुखपृष्ठाचे महत्त्व काय असते? कोणत्या प्रकारच्या पुस्तकाच्या वाचनाचा स्पर्धा परिक्षेसाठी फायदा होईल...हे आहेत, ठाणे महापालिका शाळा क्र.२३मधील विद्यार्थ्यांचे प्रश्न आणि ते विचारले आहेत राज्याचे मुख्य सचिव नितीन करीर आणि ज्येष्ठ संपादक राजीव खांडेकर यांना. या आणि अशा प्रश्नांची दोन्ही मान्यवरांनी उत्तरे देत या विद्यार्थ्यांशी संवाद साधला. निमित्त होते... ठाणे महापालिकेच्या ‘चला वाचूया' या उपक्रमाच्या उद्‌घाटनाचे.

ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या संकल्पनेतून महापालिकेच्या शाळांमधील प्रत्येक वर्गखोलीत पुस्तकांचे कपाट, वाचन कोपरा, तयार करण्यात येत आहे. या उपक्रमाचे उद्‌घाटन १४ फेब्रुवारी रोजी राज्याचे मुख्य सचिव नितीन करीर आणि ज्येष्ठ संपादक राजीव खांडेकर यांच्या हस्ते किसननगर येथील शाळा क्रमांक-२३ मधील वर्गात झाले. त्यावेळी इयत्ता आठवी आणि नववी मधील निवडक विद्यार्थ्यांशी या दोन्ही मान्यवरांनी संवाद साधला. यावेळी ‘लेट्‌स रिड फाऊंडेशन'चे प्रफुल्ल वानखेडे, अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, प्रशांत रोडे, उपायुक्त (शिक्षण) वर्षा दिक्षीत, उपायुक्त (माहिती-जनसंपर्क) उमेश बिरारी, आदि उपस्थित होते.

महापालिका शाळेतील पाचवी ते दहावी मधील सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या वर्गखोलीत सहजपणे पुस्तके उपलब्ध व्हावीत यासाठी ‘चला वाचूया' उपक्रम सुरु करण्यात आला आहे. पुस्तके सगळ्यांसाठी खुली असतील. त्या कपाटांना दरवाजे नाहीत. या पुस्तकांची काळजी विद्यार्थ्यांनीच घ्यायची आहे. तसेच वाचनाच्या नोंदी करण्यासाठी विद्यार्थ्यांना वाचनाचे पासुबकही देण्यात येणार आहे. सदर उपक्रम टप्प्याटप्प्याने महापालिकेच्या सर्व शाळांमध्ये सुरु करण्यात येणार असल्याची माहिती आयुक्त बांगर यांनी यावेळी दिली.

यानंतर विद्यार्थ्यांनी त्यांच्या वाचनाच्या सवयी, पुस्तकांची उपलब्धता, आवडलेली पुस्तके यांच्याविषयी मान्यवरांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे दिली. वाचनाचा फायदा, त्याचा अभ्यासात आणि अवांतर गोष्टींत होणारी पुस्तकांची मदत याबद्दल मुख्य सचिव नितीन करीर यांनी मार्गदर्शन केले. पुस्तकाचे मुखपृष्ठ त्या पुस्तकाची ओळख असते, असेही करीर एका प्रश्नाच्या उत्तरात म्हणाले. तर वाचन कसे असावे? याबद्दल राजीव खांडेकर यांनी सांगितले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रभारी उपमाहिती-जनसंपर्क अधिकारी प्राची डिंगणकर यांनी केले.

‘वाचन पासबुक'चे वितरण...
विद्यार्थ्यांनी या वाचन कोपऱ्यातील पुस्तके वाचल्यानंतर त्या वाचनाची नोंद करावी. त्या पुस्तकाबद्दल त्यांना जे वाटते ते लिहावे, यासाठी वाचन पासबुक तयार करण्यात आले आहे. या ‘वाचन पासुबक'चे मुख्य सचिव करीर आणि खांडेकर यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना वितरणही वितरीत करण्यात आली.

आयुक्त कार्यालयातील वाचनालयाचे उद्‌घाटन...
या कार्यक्रमापूर्वी ठाणे महापालिका मुख्यालयातील आयुक्त कार्यालयाबाहेरील प्रतिक्षाकक्षात सुरु करण्यात आलेल्या वाचनालयाचे उद्‌घाटन मुख्य सचिव नितीन करीर यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी महापालिका आयुक्त अभिजीत बांगर, ज्येष्ठ संपादक राजीव खांडेकर, ‘लेटस्‌ रिड फाऊंडेशन'चे प्रफुल्ल वानखेडे, अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा, उपायुक्त (मुख्यालय) जी. जी. गोदेपुरे, मुख्य लेखा-वित्त अधिकारी दिलीप सुर्यवंशी, कार्यकारी अभियंता धनंजय मोदे, आदि उपस्थित होते. 

Read Previous

पाचवी व आठवीच्या स्कॉलरशीप परीक्षेत नमुंमपा शाळेतील 49 विद्यार्थ्यांचे कौतुकास्पद यश

Read Next

शालेय शिक्षणात संत साहित्याचा समावेश गरजेचा -राज्यपाल