पाळीव श्वान-मांजरांना ॲन्टीरेबीज लस, जंतनाशक आरोग्य तपासणी

पनवेल : पनवेल महापालिका आणि मिनिस्ट्री ऑफ पेटस्‌ यांच्या संयुक्त विद्यमाने १० फेब्रुवारी रोजी आयुक्त गणेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पाळीव श्वान आणि मांजर ॲन्टी रेबीज लस, जंतनाशक आरोग्य तपासणी तसेच मोफत लसीकरण कार्यक्रम नवीन पनवेल येथे जागृती प्रकल्प सभागृहामध्ये घेण्यात आला. याप्रसंगी आमदार प्रशांत ठाकूर, माजी महापौर डॉ. कविता चौतमोल, मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. आनंद गोसावी, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. भगवान गीते, माजी नगरसेवक समीर ठाकूर, माजी नगरसेविका राजश्री वावेकर, ‘मिनिस्ट्री ऑफ पेटस्‌'चे प्रवीण नावंधर, देवेश नावंधर उपस्थित होते.


कुत्रा आणि मांजर पाळीव प्राणी आता माणसाच्या कुटुंबातील सदस्य झालेले आहेत. महापालिकेने या प्राण्यांची नोंद घेऊन त्यांचे स्वास्थ्य उत्तम राहावे यासाठी कार्यक्रम आखणे खूप आवश्यक होते. अशा कार्यक्रमाच्या माध्यमातून महापालिकेने  पुढाकार घेऊन आपली जबाबदारी पार पडली आहे, असे आमदार प्रशांत ठाकूर म्हणाले.

मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. आनंद गोसावी यांनी यावेळी महापालिकेच्या पशुवैद्यकीय विभागाच्या वतीने करण्यात येणाऱ्या विविध प्रकारच्या कामाची माहिती उपस्थितांना दिली. तसेच रेबीजचा प्रसार कमी करण्यासाठी महापालिकेच्या वतीने भटक्या कुत्र्यांसाठी येत्या २६ फेब्रुवारी ते १ मार्च ॲन्टी रेबीज कॅम्प राबविण्यात येणार असल्याचे सांगितले.
सदर कार्यक्रमामध्ये सुमारे ५२३ पाळीव कुत्रा आणि मांजराची नोंदणी करण्यात आली होती. यावेळी विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी, पाळीव कुत्रा आणि मांजराचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. 

 

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

अश्विनी बिद्रे हत्येच्या स्पॉटची न्यायालयाने व्हिजीट करावी