अनोळखी नंबरवरील लिंकवर क्लिक करणे पडले महाग  

नवी मुंबई : अनोळखी नंबरवरुन आलेल्या लिंकवर क्लिक करणे ऐरोलीत राहणाऱ्या आयटी कंपनी कर्मचाऱ्याला चांगलेच महागात पडले आहे. या व्यक्तीने ज्या लिंकवर क्लिक केले, त्या लिंकच्या माध्यमातून सायबर चोरट्यांनी क्रेडीट कार्ड धारकाची संपूर्ण माहिती मिळवून त्यांच्या क्रेडीट कार्डवरुन १.९० लाख रुपयांची खरेदी केल्याचे उघडकीस आले आहे. रबाले पोलिसांनी या प्रकरणी सायबर चोरट्यांविरोधात फसवणुकीसह आयटी ॲक्ट नुसार गुन्हा दाखल केला आहे.  

या प्रकरणातील तक्रारदार किशोर (४०) ऐरोली, सेक्टर-८ मध्ये राहण्यास असून ते ठाण्यातील आयटी पार्कमध्ये कामाला आहेत. १९ ऑक्टोबर रोजी किशोर यांच्या मोबाईलवर सायबर चोरट्यांनी एक मेसेज पाठवून त्यांच्या क्रेडीट कार्डवर ९८५० रुपयांचे रिवार्ड मिळत असून त्याची मुदत आज संपत असल्याचे तसेच सदर रिवॉर्ड मिळवण्यासाठी लिंकवर क्लिक करण्यास सांगण्यात आले होते. किशोर यांच्याकडे आयसीआयसीआय बँकेचे क्रेडीट कार्ड असल्याने सदरचा मेसेज बँकेकडून पाठविण्यात आला असावा, असे वाटल्याने त्यांनी मेसेज मधील सुचनेप्रमाणे लिंकवर क्लिक केले. त्यानंतर त्यावरील आयसीआयसीआय बँकेच्या फॉर्ममध्ये दिलेल्या सुचनेप्रमाणे किशोर यांनी त्यांच्या क्रेडीट कार्डची संपूर्ण माहिती भरली.  

त्यांनतर काही वेळातच सायबर चोरट्याने किशोर यांना संपर्क साधून क्रेडीट कार्डचे रिवॉर्ड पॉईंट घेण्याची माहिती देण्याच्या बहाण्याने त्यांना बोलण्यात गुंतवून ठेवले. याचदरम्यान दुसऱ्या सायबर चोरट्याने किशोर यांच्याकडून घेतलेल्या माहितीचा वापर करुन त्याद्वारे १.९० लाखाचे तीन आर्थिक व्यवहार केले. याबाबतचे मेसेज किशोर यांच्या मोबाईलवर आल्यानंतर त्यांनी फोनवर त्यांच्यासोबत बोलत असलेल्या सायबर चोरट्याला विचारणा केल्यानंतर त्याने सदरचे रिवॉर्ड पॉईंट त्यांच्या खात्यात जमा होत असल्याचे सांगून फोन कट केला. त्यानंतर किशोर यांनी सायबर चोरट्याच्या मोबाईलवर संपर्क साधला असता त्याचे फोन बंद असल्याचे आढळून आले. त्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे किशोर यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी रबाले पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. 

 

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

 ‘अटल सेतू'वर १४४ वाहनांवर कारवाई