‘बोर्ड'च्या धर्तीवरील एसएससी सराव परीक्षेचा ६ जानेवारी रोजी शुभारंभ

८५ शाळांचा सहभाग; ९९०० विद्यार्थ्यांची नांव-नोंदणी

नवी मुंबई : विद्यार्थ्यांच्या मनातील दहावीच्या परीक्षेची भिती दूर करुन दहावीच्या मुख्य परीक्षेत त्यांच्या निकालाची टक्केवारी वाढविणारी ‘श्री. गणेश नाईक चॅरिटेबल ट्रस्ट'तर्फे एसएससी बोर्डाच्या धर्तीवर आयोजित ‘श्री. गणेशजी नाईक एसएससी सराव परीक्षा'चा शुभारंभ ६ जानेवारी २०२३ रोजी दुपारी दीड वाजता नेरुळ, सेवटर-२२ मधील तेरणा मेडिकल डेंटल कॉलेज ऑडिटोरियम येथे होणार आहे, अशी माहिती ‘ट्रस्ट'चे अध्यक्ष संजीव नाईक आणि सचिव तथा नवी मुंबई भाजपा जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांनी दिली आहे.

दरवर्षी १० ते १५ लाख विद्यार्थी ‘एसएससी बोर्ड'च्या दहावीच्या परीक्षेला सामोरे जात असतात. या परीक्षेचे महत्त्व पाहता एक प्रकारचे दडपण आणि भिती बहुसंख्य विद्यार्थ्यांच्या मनात असते. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनातील सदर भिती नाहीशी करुन त्यांच्यात आत्मविश्वास भरण्यासाठी आम्ही एसएससी सराव परीक्षेचा उपक्रम सुरु केला. २५ वर्षांपूर्वी म्हणजेच १९९८ साली एसएससी सराव परीक्षेची सुरुवात ऐरोली येथे झाली. सुरुवातीला नवी मुंबईत दोनच केंद्रे होती. साधारणपणे ५०० ते ६०० विद्यार्थी परीक्षेला बसायचे. आज या परीक्षेला दरवर्षी सरासरी ९ ते १० हजाराच्या आसपास विद्यार्थी बसतात. आतापर्यंत दीड लाख पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी या सराव परीक्षेचा लाभ घेऊन मुख्य परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे, असे संजीव नाईक यांनी सांगितले.

यावर्षी ६ ते २१ जानेवारी या कालावधीमध्ये सराव परीक्षा पार पडणार आहे. यावर्षी ९९०० विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नावनोंदणी केली आहे. नवी मुंबईतील सर्वच विभागातून तब्बल ८५ शाळांचा यावर्षी सहभाग असणार आहे. महाराष्ट्रातील अन्य जिल्ह्यांमध्ये आयोजित होणाऱ्या एसएससी सराव परीक्षा या एक किंवा दोन भाषा माध्यमातून होतात; परंतु नवी मुंबईतील सराव परीक्षा मराठी, हिंदी आणि इंग्रजी या तीनही भाषा माध्यमातून घेतली जाते. ‘एसएससी बोर्ड'प्रमाणे हॉल तिकीट, परीक्षा केंद्रे, प्रश्नपत्रिका तयार करणे आणि त्या तपासणे अशी सर्व कामे तज्ञ शिक्षकांमार्फत केली जातात. अशाप्रकारे व्यापक स्वरुपात सराव परीक्षेचा सदर महाराष्ट्रातील एकमेव उपक्रम असावा, असे संजीव नाईक म्हणाले.

एसएससी सराव परीक्षेच्या गुणवत्ता यादीत येणारे विद्यार्थी मुख्य परीक्षेत देखील गुणवत्ता यादीमध्ये झळकतात, असा आजवरचा अनुभव आहे. या सराव परीक्षेच्या माध्यमातून मुख्य परीक्षेच्या आधी विद्यार्थ्यांना विषयानुुरुप ते कुठे कमी पडत आहेत, उत्तरांमधील त्रुटी किंवा उणिवा काय आहेत, या बाबी समजतात. त्यामध्ये विद्यार्थी स्वतःमध्ये सुधारणा करुन अधिक आत्मविश्वासाने मुख्य परीक्षेला सामोरे जाऊन यश संपादित करतात. एसएससी सराव परीक्षेमुळे नवी मुंबईच्या दहावीच्या परीक्षेच्या निकालाची टक्केवारी देखील वाढल्याचे शिक्षक सांगतात. बघता-बघता एसएससी सराव परीक्षा उपक्रमाने रौप्य  महोत्सवी वर्षात पदार्पण केले आहे. याचा आम्हाला विशेष आनंद असल्याचे प्रतिपादन संदीप नाईक यांनी केले. या उपक्रमाच्या सफलतेसाठी परिश्रम करणारे ‘श्री गणेश नाईक चॅरिटेबल ट्रस्ट'चे सर्व सदस्य, पदाधिकारी, नवी मुंबईतील विविध शाळा, विद्यालयांचे मुख्याध्यापक, शिक्षक, स्वयंसेवक अशा सर्व घटकांना सहकार्यासाठी संदीप नाईक यांनी धन्यवाद दिले आहेत.

उशिरा येणाऱ्या विद्यार्थ्यांनाही संधी...
दरम्यान, परिस्थिती अथवा काही कारणास्तव विद्यार्थ्यांना सराव परीक्षेसाठी वेळेवर नाव-नोंदणी करता आली नाही किंवा विद्यार्थी उशिराने नाव नोंदणीसाठी आले तरी त्यांना सराव परीक्षेमध्ये सहभागी करुन घेण्यात येणार आहे. त्यांच्यासाठी दरम्यान, च्या वतीने नाव नोंदणीसाठी विशेष कक्ष स्थापन करण्यात आला आहे. ज्या विद्यार्थ्यांना सराव परीक्षेसाठी नाव नोंदणी करायची आहे, त्यांनी ९२२१२६७८०१/ ९९२००२८५२५/ ८3६९९७७१२५ या क्रमांकावर संपर्क साधावा.

शैक्षणिक क्यूआर कोडचे वितरण...
‘ट्रस्ट'च्या वतीने विद्यार्थ्यांना विनामूल्य शैक्षणिक क्यूआर कोड भेट देण्यात येणार आहे. या कोडमध्ये शैक्षणिक व्हिडिओ असणार आहेत.

 

Read Previous

पाचवी व आठवीच्या स्कॉलरशीप परीक्षेत नमुंमपा शाळेतील 49 विद्यार्थ्यांचे कौतुकास्पद यश

Read Next

'मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा' अभियानात शाळांना भरघोस बक्षिसे जिंकण्याची संधी