ट्रक-ट्रेलर चालकांच्या चक्का जाम आंदोलनाला हिंसक वळण

आंदोलनकर्त्यांचा पोलिसांवर हल्ला; ४० वाहन चालक ताब्यात  

नवी मुंबई : ‘थर्टीफर्स्ट'च्या मध्यरात्री नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत कुठल्याही प्रकारची अनुचित घटना घडली नसली तरी, नववर्षाच्या पहिल्याच दिवशी नवी मुंबईतील ट्रक-ट्रेलर आणि डंपर चालकांनी मोटार वाहन कायद्यातील सुधारणांविरोधात पुकारलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागल्याची घटना घडली आहे.

 आंदोलनकर्त्यांना रस्त्याच्या बाजुला करण्यासाठी गेलेल्या पोलिसांवरच ४० ते ५० ट्रक-ट्रेलर-डंपर चालकांनी बांबू, लाठ्या-काठ्या आणि दगडाच्या सहाय्याने हल्ला केला. याहल्ल्यात दोन पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. या घटनेनंतर घटनास्थळावर पोलिसांची अधिक कुमक मागवून पोलिसांवर हल्ला करणाऱ्या तसेच आंदोलन करणाऱ्या अशा सुमारे ४० लोकांची धरपकड करण्यात आली. त्यानंतर उरण मार्गावरील वाहतूक सुरळीत सुरु करण्यात आली.  

केंद्र सरकारने मोटार वाहन कायद्यात सुधारणा करुन त्यात काही बदल केले आहेत. नव्या सुधारणानुसार रस्ते अपघातात एखाद्या वाहनाच्या धडकेत जखमी झालेल्या अपघातग्रस्तास संबंधित वाहन चालकाने मदत न केल्यास त्याला १० वर्षाचा कारावास  तसेच ७ लाखांचा दंड ठोठावण्यात येणार आहे. या कायद्याला विरोध करण्यासाठी १ जानेवारी राजीसकाळी ट्रक, ट्रेलर आणि डंपर चालकांनी उरण-जेएनपीटी मार्गावरील रेतीबंदर येथे ट्रेलर आणि ट्रक रस्त्यावर आडवे लागून रस्ता अडवून धरत चक्का जाम केला. त्यामुळे ऐन सकाळच्या सुमारास उरण-जेएनपीटी मार्गावर वाहतूक कोंडी झाल्याने एनआरआय पोलीस ठाण्यातील एक पोलीस उपनिरीक्षक आणि ३ पोलीस अंमलदार चक्का जाम करणाऱ्या आंदोलकांना रस्त्याच्या बाजुला काढून वाहतूक सुरळीत करण्यासाठी गेले होते.  

यावेळी ४० ते ५० आंदोलकांनी पोलिसांवरच लाठी-काठी, बांबू आणि दगडाच्या सहाय्याने हल्ला केला. या हल्ल्यात दोन पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. यावेळी आंदोलनकर्त्यांनी खाजगी वाहनांवर देखील दगडफेक आणि लाठ्या-काठ्या मारुन त्यांचे देखील नुकसान केले. या घटनेनंतर घटनास्थळावर पोलिसांची अधिक कुमक मागवून पोलिसांवर हल्ला करणाऱ्या तसेच चक्का जाम आंदोलन करणाऱ्या अशा सुमारे ४० चालकांची धरपकड केली आहे. सदर आंदोलनामुळे नववर्षाच्या पहिल्याच दिवशी उरण-जेएनपीटी मार्गावर सकाळी सुमारे २ तासापेक्षा अधिक काळ वाहतूक कोंडी झाली होती. पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना बाजुला काढल्यानंतर या मार्गावरील वाहतूक सुरळीत सुरु झाली.


दरम्यान, लाठ्या-काठ्या घेऊन पोलिसांवर हल्ला करतानाचा आंदोलनकर्त्यांचा व्हिडीओ सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल झाला आहे.  

उरण-जेएनपीटी मार्गावर रेती बंदर येथे ट्रक, ट्रेलर आणि डंपर चालकांनी पुकारलेल्या चक्का जाम आंदोलनादरम्यान पोलिसांवर हल्ला करणाऱ्या ४० ते ५० आंदोलनकर्त्यां विरोधात सरकारी कामात अडथळा आणून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच ४० आंदोलनकर्त्यां चालकांना ताब्यात घेण्यात आले आहे. चालकांनी यापुढील काळात शांततेत आंदोलन करावे, अन्यथा त्यांच्या विरोधात कठोर कारवाई करण्यात येईल. -विवेक पानसरे, पोलीस उपायुवत-परिमंडळ-१, नवी मुबई. 

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

थर्टीफर्स्ट, नववर्ष स्वागत उत्साहात साजरे