नवी मुंबई मध्ये आंतरराष्ट्रीय महिला टेनिस स्पर्धा  

१७  देशातील ६१ खेळाडू सहभागी

नवी मुंबई :  गत १० वर्षांपासून नवी मुंबईसह मुंबई, पुणेकरांसाठी विशेष आकर्षण ठरलेली आंतरराष्ट्रीय महिला टेनिस स्पर्धा उद्या २५ डिसेंबर पासून सुरु होत आहे. या स्पर्धेचे आयोजन नवी मुंबई स्पोर्टस्‌ असोसिएशन तर्फे करण्यात आले आहे. या स्पर्धेत एकूण १७ देशातील ६१ महिला टेनिसपटू सहभागी होणार असून, यावर्षी विजेत्यांना २५ हजार डॉलर ऐवजी ४० हजार डॉलर इतकी रक्कम देण्यात येणार आहे. रक्कम वाढवली गेल्यामुळे आंतरराष्ट्रीय टेनिस विश्वात १८८ रँकिंग असलेली टेनिसपटू इकरीना मायक्रोवा (रशिया) आणि १९६ रँकिंग असलेली टेनिसपटू मोयुका उचीजीमा (जपान) या नामवंत खेळाडू या स्पर्धेत सहभागी होणार आहेत.  

या स्पर्धेत खेळलेल्या मुलींना ऑस्ट्रेलियामध्ये होणाऱ्या ऑलिंपिक स्पर्धेत सहभाग घेता येणार आहे. या स्पर्धेत यापूर्वी खेळलेल्या महिला टेनिसपट्टूंनी ऑस्ट्रेलियन ओपन, ग्रँड स्लॅम, ऑलम्पिक स्पर्धेमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली आहे. तसेच या स्पर्धेत  खेळणाऱ्या महिला टेनिसपट्टूंच्या गुण संख्येत देखील वाढ होणार आहे. त्यामुळे त्यांना ग्रँड स्लॅम, ऑस्ट्रेलियन ओपन आणि ऑलिंपिक स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी फायदा होणार आहे.

दरम्यान, आंतरराष्ट्रीय महिला टेनिस खेळाडूंबरोबर नवी मुंबई आणि देशातील अन्य महिला खेळाडूंनाही या स्पर्धेत स्थान देण्यात आले आहे. टेनिस विश्वात महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या या स्पर्धेमुळे येथील खेळाडूंना आंतरराष्ट्रीय दर्जाचे टेनिस कोर्ट उपलब्ध झाले आहे.  

नवी मुंबई स्पोर्टस्‌ असोसिएशन द्वारा आयोजित केल्या जाणाऱ्या टेनिस स्पर्धेमुळे देशातील महिला टेनिस खेळाडूंमध्ये स्फूर्ती निर्माण होते. उदयोन्मुख खेळाडूंना या स्पर्धेमुळे उत्तम संधी प्रापत झाली आहे. बॉल बॅकसाठी येथील खेळाडू ठेवले जातात. त्यांना या स्पर्धेच्या बारकाव्याचा अभ्यास होणार आहे. या स्पर्धेमुळे नवी मुंबई परिसराला अनन्य महत्त्व प्रापत झाले असल्याची माहिती आयटीएफ स्पर्धा संचालक तथा ‘नवी मुंबई स्पोर्टस्‌ असोसिएशन'चे उपाध्यक्ष डॉ. दिलीप राणे यांनी दिली.

बेस्ट ग्राउंड म्हणून गौरव
आंतरराष्ट्रीय महिला टेनिस स्पर्धेचे उद्‌घाटन आमदार गणेश नाईक यांच्या हस्ते उद्या २५ डिसेंबर रोजी होणार असून, या स्पर्धेच्या पारितोषिक वितरण प्रसंगी स्थानिक आमदार सौ. मंदाताई म्हात्रे उपस्थित राहणार आहेत. नवी मुंबई स्पोर्टस्‌ असोसिएशन तर्फे यापूर्वी फिफा स्पर्धेसाठी सराव मैदान तयार करण्यात आले होते. भारतातील बेस्ट फुटबॉल ट्रेनिंग ग्राउंड तयार केले म्हणून, या मैदानाला गौरवण्यात आल्याचे डॉ. दिलीप राणे यांनी सांगितले. 

Read Previous

द्रोणागिरी हायस्कूल इंग्रजी माध्यम करंजा विद्यालयात तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धा संपन्न

Read Next

रा. फ. नाईक विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालयात वार्षिक क्रीडा महोत्सव संपन्न