महापालिका शाळांमध्ये अस्वच्छता; विद्यार्थी-विद्यार्थिनींचे आरोग्य धोक्यात?

शाळांची सुरक्षा वाऱ्यावर?

वाशी : चार दिवसांपूर्वी घणसोली मधील नवी मुंबई महापालिका शाळेत पाण्याविना हाल झाल्याचे प्रकरण समोर आल्याचे प्रकरण  ताजे असताना आता तुर्भे मधील महापालिका शाळेत अस्वच्छता असल्याचे समोर आले आहे. अस्वच्छ, घाणेरड्या वातावरणात विद्यार्थी-विद्यार्थिनी शिक्षण घेत असल्याने त्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

नवी मुंबई महापालिका शिक्षण विभागाने सर्व शाळांचे साफसफाई कंत्राट खाजगी कंत्राटदारांना दिले आहे. मात्र, या कंत्राटदारांकडून शाळांच्या साफसफाईकडे पुरते दुर्लक्ष होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. महापालिका शाळा क्रमांक-२२ आणि शाळा क्रमांक-७१ मध्ये शौचालयाची योग्य सफाई केली जात नाही. तसेच अनेक ठिकाणी गुटखा, पान खाऊन थुकलेले आणि वर्गात कचरा असल्याचे आढळून आले. अस्वच्छ वातावरणात विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जात आहे. शाळेतील अस्वच्छ वातावरणामुळे विद्यार्थी आजारी पडत असल्याची ओरड विद्यार्थ्यांचे पालक करीत आहेत. त्यामुळे शाळेतील साफसफाई न करुन विद्यार्थ्याचे आरोग्य धोक्यात घालणाऱ्या साफसफाई ठेकेदारांवर कारवाई करावी, अशी मागणी आता पालकांकडून जोर धरु लागली आहे.

शाळांची सुरक्षा वाऱ्यावर?
नवी मुंबई शहरातील अल्पवयीन मुले बेपत्ता होत आहेत. या पार्श्वभूमीवर नवी मुंबई महापालिका प्रशासनाने शाळांची सुरक्षा चोख ठेवणे बंधनकारक आहे. मात्र, महापालिका शाळा परिसरात कुणीही येतो-जातो, त्यास सुरक्षा रक्षक हटकत नाहीत. त्यामुळे भविष्यात महापालिका शाळा परिसरात एखादा अनुचित प्रकार घडला तर त्यास जबाबदार कोण?, असा सवाल पालक उपस्थित करीत आहेत.

तुर्भे विभागातील नवी मुंबई महापालिका शाळा क्रमांक-२२ आणि शाळा क्रमांक-७१ मध्ये पाहणी केली असता, अनेक ठिकाणी गुटखा, पान खाऊन थुंकलेले आणि वर्गात कचरा असल्याचे आढळून आले. तसेच सुरक्षारक्षक मद्य प्राशन करुन गेटजवळ खुर्चीवर बसून झोपत असल्याचे आढळले. त्यामुळे साफसफाई करणाऱ्या ठेकेदारांवर महापालिका आयुक्तांनी कारवाई करण्याची गरज आहे. - महेश कोटीवाले, उपशहर प्रमुख- शिवसेना (उबाठा).

तुर्भे मधील नवी मुंबई महापालिका शाळांमध्ये साफसफाई ठेकेदारांकडून सफाई केली जात नसेल तर त्याची चौकशी करुन उचित कार्यवाही केली जाईल. - योगेश कडुस्कर, उपायुक्त (शिक्षण विभाग) - नवी मुंबई महापालिका. 

 

Read Previous

पाचवी व आठवीच्या स्कॉलरशीप परीक्षेत नमुंमपा शाळेतील 49 विद्यार्थ्यांचे कौतुकास्पद यश

Read Next

पाठीवरील दप्तराच्या ओझ्यामुळे वाकला कणा