आशुतोष साहा नवी मुंबई महापालिका श्री

‘नवी मुंबई महापालिका श्री राज्यस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धा'मध्ये २०० शरीरसौष्ठपटुंचा सहभाग

नवी मुंबई : नवी मुंबईतील शरीरसौष्ठवपटुंना उत्तेजन मिळावे, त्यांना राज्यभरातील इतर शरीरसौष्ठवपटुंकडून प्रेरणा मिळावी या दृष्टीने ‘नवी मुंबई महापालिका श्री राज्यस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धा'चे १९९५-९६ पासून आयोजन करीत आहे. तसेच नवी मुंबईतील शरीरसौष्ठवपटुंसाठी स्वतंत्र स्पर्धा घेऊन त्यांना उत्तेजन देण्याचेही काम महापालिका करीत आहे. नवी मुंबई महापालिका श्री राज्यस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धा आणि नवी मुंबई महापालिका क्षेत्र श्री शरीरसौष्ठव स्पर्धा विष्णुदास भावे नाट्यगृहात उत्साहात संपन्न झाली. यावेळी राज्यभरातील विविध जिल्ह्यांतून आलेल्या २०० हुन अधिक शरीरसौष्ठवपटूंनी या स्पर्धेत सहभागी होत सदर उपक्रम यशस्वी केला.

‘नवी मुंबई महापालिका श्री राज्यस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धा'मध्ये ठाणे पश्चिम जिल्ह्याच्या आशुतोष साहा यांनी ‘चॅम्पियन ऑफ चॅम्पियन' असा प्रथम क्रमांकाचा बहुमान पटकावला. ठाणे जिल्ह्याचे चेतन नाईक यांनी उपविजेतेपद संपादन केले. ठाणे पश्चिम जिल्ह्याच्या संतोष यादव यांनी ‘मोस्ट इम्प्रुव्हड बॉडी बिल्डर' किताब तसेच ठाणे पश्चिम जिल्ह्याच्याच छेवंग लामा यांनी ‘रनर अप‘सिडको' किताब मिळविला.

या राज्यस्तरीय स्पर्धेत ५५ किलो वजनी गटात कोल्हापूरचे प्रतिक मगदूम, ६० किलो वजनी गटात ठाणे जिल्ह्याचे संतोष यादव, ६५ किलो वजनी गटात ठाणे जिल्ह्याचे नितीन म्हात्रे, ७० किलो वजनी गटात ‘मुंबई'चे प्रतिक पांचाळ, ७५ किलो वजनी गटात ‘मुंबई'चे संदीप सावळे, ८० किलो वजनी गटात ‘कोल्हापूर'चे ऋषिकेष वगरे, ८५ किलो वजनी गटात ‘ठाणे'चे आशुतोष साहा व ८५ किलोवरील वजनी गटात ‘ठाणे'चे चेतन नाईक यांनी प्रथम पारितोषिके संपादन केली. प्रत्येक वजनी गटातील अनुक्रमे ६ सहा विजेत्यांना रोख पारितोषिके आणि प्रशस्तीपत्रके प्रदान करण्यात आली.

त्याचप्रमाणे ‘नवी मुंबई महापालिका क्षेत्र श्री शरीरसौष्ठव स्पर्धा'मध्ये वाशी येथील अक्षय पाटील यांनी ‘चॅम्पियन ऑफ चॅम्पियन' असा प्रथम क्रमांकाचा चषक संपादन केला. ‘वाशी'च्याच निखील आंबोरे यांनी उपविजेतेपद पटकाविले. या स्पर्धेतील ५० किलो वजनी गटात ऋषिकेश सावंत, ५५ किलो वजनी गटात अनिकेत खरात, ६० किलो वजनी गटात मयुर म्हात्रे, ६५ किलो वजनी गटात अक्षय पाटील, ७० किलो वजनी गटात निखील आंबोरे, ७५ किलो वजनी गटात धीरज पाटील अशाप्रकारे विविध वजनी गटांमध्ये प्रथम पारितोषिके संपादन केली. प्रत्येक वजनी गटातील अनुक्रमे ५ विजेत्यांना रोख पारितोषिके आणि प्रशस्तीपत्रके प्रदान करण्यात आली.

या प्रसंगी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विजयकुमार म्हसाळ, क्रीडा विभागाच्या उपायुक्त ललिता बाबर, माजी खासदार संजीव नाईक, माजी नगरसेवक जी. एस. पाटील, क्रीडा अधिकारी रेवप्पा गुरव तसेच शरीरसौष्ठव क्षेत्रातील मान्यवर चेतन पगारे, प्रशांत आपटे, राजेंद्र चव्हाण, विक्रम रोठे, हेमंत खेबडे उपस्थित होते.

 

Read Previous

द्रोणागिरी हायस्कूल इंग्रजी माध्यम करंजा विद्यालयात तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धा संपन्न

Read Next

गुरुकूल स्कुल ऑलंम्पीक स्पर्धेत शांतिनिकेतन पब्लिक स्कूलचे यश