ठाणे महापालिका शाळांचा लवकरच कायापालट

दुरुस्तीला निधी तर २०० शिक्षकांची होणार भरती

 ठाणे : ठाणे महापालिकेच्या शाळांची दुरुस्ती आणि सुविधांअभावीे झालेली दुर्दशा सुधारण्यासाठी आणि शाळेचा दर्जा उंचावण्यासाठी शिक्षणमंत्र्यांनी सकारात्मक निर्णय घेतल्याने आता ठाणे महापालिका शाळांचा कायापालट होणार असल्याचे चित्र आहे.

विधी मंडळाच्या नागपूर अधिवेशनात ‘भाजपा'चे आमदार संजय केळकर यांनी उपस्थिती केलेल्या प्रश्नाला सकारात्मक उत्तर देताना मंत्री उदय सामंत यांनी शाळेच्या दुरुस्ती आणि सुविधांसाठी पुरेसा निधी आणि त्या सोबतच शिक्षणाचा दर्जा वाढविण्यासाठी २०० शिक्षकांची भरती करण्याचे सुतोवाच केल्याने आता ठाणे महापालिकेच्या शाळामध्ये शैक्षणिक दर्जा उंचविणार आहे.

ठाणे शहरात महापालिका शाळांची अवस्था दयनीय असून ६८ शाळांपैकी फक्त ३४ शाळांच्या दुरुस्तीसाठी निधी देण्यात आला आहे. शिक्षण व्यवस्था सक्षम करण्यासाठी वाढीव निधी देण्यात यावा, याचबरोबर २०० शिक्षकांची भरती करण्याची मागणी आमदार संजय केळकर यांनी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात केली. यावेळी मंत्री उदय सामंत यांनी वाढीव निधी देण्याबाबत आश्वासित करतानाच शिक्षक भरतीच्या सूचना महापालिका प्रशासनाला दिल्या आहेत.  ठाणे शहरातील महापालिका शाळांच्या इमारतींची दुरावस्था असून अनेक शाळा बिनशिक्षकी आहेत. याची पाहणी करुन आमदार संजय केळकर यांनी सदर बाब महापालिका आयुक्तांच्या निदर्शनास आणली होती.

हीच बाब त्यांनी लक्ष्यवेधीवर बोलताना सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली. महापालिकेच्या ३४ शाळा आणि ११ बालवाड्यांची दुरुस्ती सुरु करण्यात आली आहे. मात्र, शहरात ६८ शाळा नादुरुस्त असून संरक्षक भिंती, इमारतीचे बांधकाम, पाण्याची व्यवस्था, शौचालय आदि कामांसाठी पुरेसा निधी उपलब्ध करण्याची गरज आहे. अनेक शाळांमध्ये शिक्षकच नसून तासिका शिक्षकांकडून शाळा चालवल्या जात आहेत. त्यामुळे महापालिका शाळांचा हजेरीपट मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे. एकीकडे शहराची रंगरंगोटी होत असताना दुसरीकडे शिक्षण व्यवस्था देखील सक्षम होण्याची गरज आहे. त्यासाठी ज्यादा निधी देणार आहात का? असा प्रश्न विचारत आ. केळकर यांनी सुमारे २०० शिक्षकांची गरज असून त्याबाबतचा प्रस्ताव शासनाकडे पडून असल्याचे सांगितले. त्याला मंजुरी देण्याची मागणी केळकर यांनी केली.

६८ शाळांचे होणार स्ट्रक्चरल ऑडीट...
ठाणे महापालिकेच्या शाळांच्या दुरुस्तीसाठी मुबलक निधी मिळाल्यास आता महापालिकेच्या १९४ शाळा आणि ६४ बालवाड्यांमधील ६८ शाळा या जुन्या असून त्याचे लवकरच स्ट्रक्चरल ऑडीट करण्यात येणार असल्याची माहिती ना. उदय सामंत यांनी दिली. यात ३४,७२३ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. २०१९-२० या वर्षात दुरुस्तीसाठी २ कोटी ९२ लाख २८,५३१ रुपये खर्च करण्यात आले. २०२०-२१ या वर्षात ४ कोटी २३ लाख ३१,१६० रुपये खर्च करण्यात आले. २०२१-२२ या वर्षात ६ कोटी ३३ लाख ५८,२११ रुपये खर्च करण्यात आले. आता पुन्हा दुरुस्तीसाठी जवळपास १६ कोटी ९८ लाखांची तरतूद करण्यात आली असून वर्षभरात सदर काम पूर्ण होण्याची प्रतिक्षा आहे. 

 

Read Previous

पाचवी व आठवीच्या स्कॉलरशीप परीक्षेत नमुंमपा शाळेतील 49 विद्यार्थ्यांचे कौतुकास्पद यश

Read Next

महापालिका शाळांमध्ये अस्वच्छता; विद्यार्थी-विद्यार्थिनींचे आरोग्य धोक्यात?