‘राज्यस्तरीय शालेय वेटलिपटींग क्रीडा स्पर्धा' दिमाखात सुरु

जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्‌घाटन संपन्न

ठाणे : ‘भारतीय शालेय खेळ महासंघ'च्या अंतर्गत महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा-युवक सेवा संचालनालयाच्या संयुक्त विद्यमाने तथा राज्यातील प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हा क्रीडा परिषद मार्फत प्रत्येक शैक्षणिक वर्षात विविध खेळांच्या १४, १७, १९ वर्षाआतील शालेय मुला-मुलींच्या तालुका, जिल्हा, विभाग, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर स्पर्धेचे आयोजन करण्यात येते.

शासनाच्या क्रीडा-युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, ठाणे मार्फत १७, १९ वर्षाखालील मुले आणि मुली राज्यस्तरीय शालेय वेटलिपटींग क्रीडा स्पर्धा सन २०२३-२०२४ चे आयोजन ८ ते १० डिसेंबर २०२३ या कालावधीत पोखरण रोड-२ मधील ज्येष्ठ कवी तथा साहित्यिक स्व. बाबुराव सरनाईक जिम्नॅस्टिक्स संकुल येथे करण्यात आले आहे. या स्पर्धेचे उद्‌घाटन जिल्हाधिकारी ‘ठाणे'चे अशोक शिनगारे यांच्या हस्ते संपन्न झाले.

या कार्यक्रमास ठाणे महापालिका उपायुक्त आणि शिवछत्रपती पुरस्कारार्थी (क्रीडा) मिनल पालांडे, ठाणे महापालिका माजी परिवहन सदस्य उज्ज्वला माने, ‘महाराष्ट्र राज्य वेटलिपटींग संघटना'चे पदाधिकारी प्रमोद चोळकर, अनिल माऊली, सह सचिव गणेश खानविलकर, छत्रपती पुरस्कारार्थी राजेश कामथे, आदि उपस्थित होते.

या राज्यस्तरीय शालेय वेटलिपटींग क्रीडा स्पर्धेकरिता महाराष्ट्र राज्यातील अमरावती, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, लातूर, मुंबई, नागपूर, नाशिक, पुणे आणि क्रीडा प्रबोधिनी या नऊ विभागातून १८० मुले, १८० मुली, ३६ संघ व्यवस्थापक, ३ निवड समिती सदस्य, ३० तांत्रिक अधिकारी यांच्यासह एकूण ५०० जण सहभागी झालेले आहेत.

सदर राज्यस्तरीय स्पर्धेत सहभागी झालेल्या खेळाडुंची निवास व्यवस्था ठाणे आपत्ती निवारण दल (टीडीआरएफ) येथे करण्यात आलेली आहे. या राज्यस्तरीय स्पर्धेत प्रविण्य प्राप्त केलेल्या खेळाडुंना ट्रॉफी, प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी सुवर्णा बारटक्के यांनी दिली आहे. 

Read Previous

द्रोणागिरी हायस्कूल इंग्रजी माध्यम करंजा विद्यालयात तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धा संपन्न

Read Next

आशुतोष साहा नवी मुंबई महापालिका श्री