ठाणे जिल्हा कबड्डी अजिंक्यपद निवड चाचणी स्पर्धेत नवी मुंबई महापालिका संघाचा बोलबाला

कुमार गटात अंतिम विजेतेपद; खुल्या पुरुष गटात पटकावला तृतीय क्रमांक

नवी मुंबई : ‘ठाणे जिल्हा कबड्डी अजिंक्यपद निवड चाचणी स्पर्धा'मध्ये जिल्हास्तरीय शहरी विभागात कुमार गटात ‘नवी मुंबई महापालिका क्रीडा प्रशिक्षण केंद्र'च्या संघाने अंतिम विजेतेपद पटकावित निर्विवाद यश संपादित केले. त्याचप्रमाणे विशेष म्हणजे खुल्या पुरुष गटातही तृतीत क्रमांक पटकाविला. या विजेतेपदाच्या चषकांसह कबड्डी संघाने महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांची भेट घेतली. यावेळी सर्व खेळाडू आणि त्यांच्या प्रशिक्षकांचे कौतुक करीत आयुक्त नार्वेकर यांनी नवी मुंबई शहराचा नावलौकिक असाच उंचावर रहा असे म्हणत त्यांचे अभिनंदन केले. याप्रसंगी महापालिका क्रीडा-सांस्कृतिक कार्य विभागाच्या उपायुक्त ललिता बाबर, क्रीडा अधिकारी रेवप्पा गुरव उपस्थित होते.

धर्मवीर क्रीडा संकुल, कोपरी, ठाणे येथे २ ते १० नोव्हेंबर २०२३ या कालावधीत संपन्न झालेल्या ठाणे जिल्हा कबड्डी अजिंक्यपद निवड चाचणी स्पर्धेमध्ये जिल्हास्तरीय शहरी विभाग कुमार गटात नवी मुंबई महापालिका क्रीडा प्रशिक्षण केंद्राच्या संघाने सर्वच सामन्यांमध्ये दमदार खेळ करीत तब्बल १२६ संघ सहभागी झालेल्या शहरी विभागात कुमार गटाच्या अंतिम फेरीपर्यंत मजल मारली. अंतिम सामन्यातही अतिशय दमदार खेळ करत ठाणे जिल्ह्यातील बलाढ्य मानल्या जाणाऱ्या ग्रिफीन जिमखाना या संघाला ५६ विरुध्द ३० अशा २६ गुणांनी पराभूत करुन नवी मुंबईच्या कुमार वीरांनी अंतिम विजेतेपद पटकाविले.

या संघात कर्णधार दिपक केवट याच्या नेतृत्वाखाली आफताब मन्सुरी, पियुष तिवारी, रिंकू केवट, प्रिन्स तिवारी, नवीन राठोड, अमित गिरी, विशेष साहू, अंकित प्रजापती, कुणाल राय, आदि खेळाडुंनी चमकदार कामगिरी करुन ठाणे जिल्ह्यातील कुमार गटातील अनेक बलाढ्य संघांना पराभूत करत अंतिम विजेतेपद प्राप्त केले.

यात विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे आगामी १ ते ५ डिसेंबर २०२३ या कालावधीत होणाऱ्या राज्यस्तरीय कुमार अजिंक्यपद निवड चाचणी स्पर्धेकरिता ठाणे जिल्हा कबड्डी संघात महापालिकेच्या संघातील दिपक केवट, पियुष तिवारी आणि आफताब मन्सुरी या तीन खेळाडुंची निवड झालेली आहे. आयुक्त राजेश नार्वेकर यांनी या तिघांचेही विशेष कौतुक करीत त्यांना पुढील स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या.

नवी मुंबई महापालिका क्रीडा प्रशिक्षण केंद्राचा संघ मागील ४ वर्षांपासून ‘ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशन'कडे रितसर नोंदणीकृत असून या संघाने आता पुरुषांच्या खुल्या गटात कबड्डी स्पर्धेत खेळण्यास सुरुवात केलेली आहे. यावर्षी खुल्या गटामध्ये ठाणे जिल्ह्यातील अनेक अत्यंत तुल्यबळ संघ होते. यामध्ये नवी मुंबई महापालिका क्रीडा प्रशिक्षण केंद्राच्या पुरुष संघाने उपांत्य फेरीत प्रवेश करून तृतीय क्रमांक पटकाविला आहे. कुमार गटाप्रमाणेच खुल्या गटात सुध्दा दखलपात्र खेळ करुन नवी मुंबईकर कबड्डीपटुंनी सर्व क्रीडाप्रेमींची मने जिंकली. या संघात कर्णधार सुनील राठोड यांच्या नेतृत्वाखाली ओमकार मोर्या, रमेश बेनवांसी, आशिष जाधव, सुजित कनोजिया, दिपक केवट, आफताब मन्सुरी, पियुष तिवारी, रिंकू केवट, नवीन राठोड या खेळाडुंनी उत्तम खेळ करीत संघाला तृतीय क्रमांकाचे यश मिळवून दिले.

‘नवी मुंबई महापालिका क्रीडा प्रशिक्षण केंद्र'मधील कबड्डी संघ सातत्याने विविध स्पर्धा जिंकून संपूर्ण राज्यातील कबड्डीप्रेमींसह पदाधिकारी यांचे लक्ष वेधताना दिसून येत आहे. या दोन्ही संघास प्रशिक्षक रविंद्र सकपाळ आणि व्यवस्थापक भट्टू निकम यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. 

 

Read Previous

द्रोणागिरी हायस्कूल इंग्रजी माध्यम करंजा विद्यालयात तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धा संपन्न

Read Next

‘राज्यस्तरीय शालेय वेटलिपटींग क्रीडा स्पर्धा' दिमाखात सुरु