‘स्वच्छ नवी मुंबई हाफ मॅरेथॉन' स्वच्छतेचा संदेश देत यशस्वी  

साडेचार हजारपेक्षा अधिक नागरिकांचा सहभाग

नवी मुंबई : नवी मुंबई महापालिका तर्फे करण्यात येत असलेल्या स्वच्छताविषयक कार्याला सहकार्य करण्याच्या आणि प्रोत्साहन देण्याच्या भूमिकेतून ‘लेट्‌स सेलिब्रेट फिटनेस' या संस्थेच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या ‘स्वच्छ नवी मुंबई हाफ मॅरेथॉन' मध्ये साडेचार हजारपेक्षा अधिक नागरिकांनी उत्साहाने सहभागी होत मॅरेथॉन यशस्वी केली.
नवी मुंबई महापालिका अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले, उपायुक्त (घनकचरा व्यवस्थापन विभाग) डॉ. बाबासाहेब राजळे, उपायुवत (क्रीडा विभाग) ललिता बाबर, क्रीडा अधिकारी रेवप्पा गुरव आणि अभिलाषा म्हात्रे यांनी याप्रसंगी उपस्थित राहून सहभागी धावपटूंना प्रोत्साहित केले.

नवी मुंबई शहर स्वच्छतेसाठी समर्पित भावनेने अहोरात्र काम करणाऱ्या महापालिका स्वच्छताकर्मींच्या बद्दल कृतज्ञता व्यक्त करीत महापालिकेच्या स्वच्छता कार्याला सहकार्य म्हणून नवी मुंबईकर नागरिकांमध्ये कचऱ्याचे ३ प्रकारे वर्गीकरण करणे आणि कचऱ्याची विल्हेवाट याबाबत जनजागृती करण्यासाठी तसेच ‘निश्चय केला, नंबर पहिला' असे महापालिकेचे ध्येय साध्य करण्यासाठी या ‘स्वच्छ मॅरेथॉन'चे आयोजन करण्यात आले होते, असे ‘लेट्‌स सेलिब्रेट फिटनेस'च्या संयोजक रिचा समित यांनी सांगितले.

२६ नोव्हेंबर रोजी सकाळी ५.३० वाजता सुरु झालेल्या या ‘स्वच्छ नवी मुंबई हाफ मॅरेथॉन' मध्ये ५ किलोमीटर अंतराच्या मॅरेथॉनमधून अपोलो रुग्णालयाच्या कॅन्सर सेंटरने अंत थॅलेसेमियाचा या घोषवाक्यास अनुसरुन जनजागृती केली. आयडीबीआय बँकेने दहा किलोमीटर आणि २१ किलोमीटर स्वच्छता रन आयोजनात सहकार्य केले.

विशेष म्हणजे या मॅरेथॉनमध्ये २०० पेक्षा अधिक तृतीयपंथी नागरिक सहभागी झाले होते. याशिवाय अडीचशेपेक्षा अधिक दिव्यांग व्यक्तींनी तसेच महाराष्ट्र राज्यस्तरीय अंध दिव्यांगांच्या कल्याणकारी संस्था सदस्यांनीही यामध्ये सहभागी होत आपली सामाजिक बांधिलकी प्रदर्शित केली. रोटरी क्लब नवी मुंबई यांचेही मॅरेथॉन आयोजनात सहकार्य लाभले.
‘स्वच्छ नवी मुंबई हाफ मॅरेथॉन' मधील २१ किलोमीटर अंतराच्या हाफ मॅरेथॉनमध्ये वय १८ ते २९ पुरुष गटात उदयसिंग पडवी आणि महिला गटात आरती देशमुख यांनी विजेतेपद पटकावले. ३० ते ३९ वर्ष पुरुष गटात शशी दिवाकर आणि महिला गटात सोनिया प्रामाणिक यांनी तसेच ४० ते ४९ वर्ष पुरुष गटात शिवानंद शेट्टी आणि महिला गटात वरुणा राव यांनी तर ६० वर्षावरील पुरुष गटात भूपेंद्र हरदेव तसेच ५० ते ५९ महिला गटात गीतांजली लेंका यांनी विजेतेपद पटकावले. प्रत्येक गटातील पहिल्या तीन क्रमांकांना पारितोषिके देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. २१ किलोमीटर प्रमाणे १० आणि ५ किलोमीटर अंतराच्या पुरुष आणि महिला गटातील विजेत्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी आयोजन सहकार्य करणाऱ्या संस्थांचा ‘लेट्‌स सेलिब्रेट फिटनेस' तर्फे सन्मान करण्यात आला. तसेच ‘लेट्‌स सेलिब्रेट फिटनेस' पदाधिकाऱ्यांच्या हस्तेही पारितोषिके वितरित करण्यात आली.

नवी मुंबई महापालिकेच्या स्वच्छता कार्याला सहकार्य करण्याची भूमिका घेऊन ‘लेट्‌स सेलिब्रेट फिटनेस' या संस्थेने स्वच्छ नवी मुंबई हाफ मॅरेथॉन सारखा अभिनव उपक्रम राबविल्याबद्दल महापालिका तर्फे त्यांचे आभार व्यक्त करण्यात आले. 

Read Previous

द्रोणागिरी हायस्कूल इंग्रजी माध्यम करंजा विद्यालयात तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धा संपन्न

Read Next

 ठाणे जिल्हा कबड्डी अजिंक्यपद निवड चाचणी स्पर्धेत नवी मुंबई महापालिका संघाचा बोलबाला