ठाणे मधील विविध विकास प्रकल्पांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण
विज्ञान मेळाव्यातील आंतरशालेय प्रकल्पात १५० विद्यार्थी सहभागी
नेरुळच्या टिळक पब्लिक स्कूलमध्ये विज्ञान मेळावा आणि आंतरशालेय प्रकल्प स्पर्धा - श्रीजन
नवी मुंबई : टिळक एज्युकेशन सोसायटीच्या संस्थापिका स्वर्गीय श्रीमती शारदा कुरूप ह्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ टिळक पब्लिक स्कूल सीवूड्स - नेरुळ येथे ४ नोव्हेंबर रोजी विज्ञान मेळावा आणि आंतरशालेय प्रकल्प स्पर्धा-श्रीजन आयोजित करण्यात आली होती. ह्या मेळाव्यामध्ये नर्सरी ते बारावीपर्यंतच्या वर्गांनी सुंदर प्रकल्प आणि ३-डी मॉडेल्स सादर केले.
एकूण ४ गटांमध्ये पर्यावरणाची काळजी, दैनंदिन जीवनातील विज्ञान, तंत्रज्ञान आणि खेळणी, आर्टिफिशियल इंटेलिजन्स मध्ये नवोपक्रम तसेच अंतराळ अन्वेषण आणि वसाहतीकरण इ. विषयांचा समावेश होता.
या प्रदर्शनात नवी-मुंबईतील सुमारे ३० शाळांमधून सुमारे १५० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आणि त्यांच्यातील नाविन्यपूर्ण आणि सर्जनशील कलागुणांचे प्रदर्शन केले. टिळक एज्युकेशन सोसायटीचे संचालक डॉ. अजित कुरूप यांनी सहभागी स्पर्धकांच्या नाविन्यपूर्ण कल्पनांचे कौतुक केले त्याचबरोबर विजेता स्पर्धकांचे बक्षीस आणि प्रमाणपत्रे देऊन अभिनंदन केले. विविध गटांतील काही उल्लेखनीय विजेते पुढीलप्रमाणे - न्यू होरायझन पब्लिक स्कूल; अमृता विद्यालयम; टिळक इंटरनॅशनलस्कूल; प्रेझेंटेशन कॉन्व्हेंट; एसबीओए पब्लिक स्कूल; डीएव्ही, नेरूळ; एमएनआर स्कूल ऑफ एक्सलन्स आणि एसएनजी इंटरनॅशनल स्कूल इ. मधून होते. स्पर्धेच्या प्रमुख पाहुण्या आणि परीक्षिका बीएआरसीच्या डॉ. वंदना पुल्हाणी आणि होमी भाभा केंद्राच्या सौ. सोनाली कठाळे यांनी सर्व सहभागी स्पर्धकांच्या अभिनव कल्पनांचे कौतुक केले आणि त्यांच्या दडलेल्या कलागुणांना बाहेर आणल्याबद्दल शाळेचे कौतुक केले. टिळक पब्लिक स्कूलच्या मुख्याध्यापिका, श्रीमती रुबी वर्गीस म्हणाल्या की, ”इमॅजिन-इन्व्हेंट-इन्स्पायर” या थीमसह श्रीजन ह्या स्पर्धेचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये अधिक आत्मविश्वास वाढवून त्यांना भविष्यासाठी तयार करणे हा आहे.