मिरा-भाईंदर महापालिकेत ‘सीसीटीव्ही मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्ष'
मोबाईल फोन स्नॅचींग करणारी टोळी गजाआड
नवी मुंबई गुन्हे शाखा युनिट-२ पथकाची कारवाई
नवी मुंबई : रस्त्याने मोबाईल फोनवर बोलत जाणाऱ्या व्यक्तींच्या हातातील मोबाईल फोन खेचून मोटार सायकलवरुन धुम ठोकणाऱ्या टोळीला अखेर नवी मुंबई गुन्हे शाखा युनिट-२ पथकाने अटक केली आहे. या टोळीने गेल्या महिन्याभरामध्ये नवी मुंबई पोलीस आयुवतालय हद्दीत केलेले मोबाईल फोन स्नॅचींगचे १७ गुन्हे उघडकीस आले असून, गुन्हे शाखेने या टोळीकडून तब्बल ५ लाख २ हजार ७०० रुपये किंमतीचे एकुण २९ मोबाईल फोन हस्तगत केले आहेत.
या कारवाईत अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये भारत प्रल्हाद राठोड (वय-१९), देवानंद विष्णु जाधव (वय-१९), दिपक रमेश राठोड (वय-१९) आणि वैभव किसन जगताप (वय-२४) या चौघांचा समावेश असून, सदर सर्व आरोपी पनवेल आणि कळंबोली भागात राहणारे आहेत. सदर लुटारु मोबाईल फोनवर बोलत रस्त्याने पायी चालत जाणाऱ्या व्यक्तींच्या हातातील मोबाईल फोन खेचून धुम स्टाईलने मोटार सायकलवरून पळून जात होते. गेल्या काही दिवसांपासून या टोळीने तळोजा, कळंबोली, कामोठे, पनवेल या भागामध्ये हैदोस घातला होता. त्यामुळे नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, अपर पोलीस आयुक्त दिपक साकोरे, गुन्हे शाखेचे पोलीस उपआयुक्त अमित काळे यांनी सदर गुन्हे उघडकीस आणून आरोपींना अटक करण्याचे आदेश दिले होते.
वरिष्ठांच्या आदेशानुसार ‘नवी मुंबई गुन्हे शाखा युनिट-२'चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण फडतरे, पोलीस उपनिरीक्षक मानसिंग पाटील, दिलीप भंडे, सुनिल गिरी आदींच्या पथकाने नवी मुंबई पोलीस आयुक्तालय हद्दीमध्ये घडलेल्या गुन्ह्यांची माहिती मिळविली. त्यानंतर सर्व घटनास्थळी भेटी देऊन, तांत्रिक तपासाद्वारे आरोपी बाबत माहिती संकलित केली. त्यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने गोपनीय बातमीदारांच्या मदतीने या टोळीतील आरोपींची माहिती मिळवून त्यांना पनवेल तालुक्याच्या हद्दीत घडलेल्या मोबाईल फोन स्नॅचींगच्या गुन्ह्यात अटक केली.
मोबाईल चोर टोळीच्या चौकशीत त्यांनी नवी मुंबई पोलीस आयुक्तालय हद्दीत पनवेल तालुका-२, कामोठे-५, तळोजा-५, पनवेल शहर, खांदेश्वर, कळंबोली, खारघर आणि सीबीडी या पोलीस ठाणे हद्दीत प्रत्येकी १ असे एकुण १७ मोबाईल फोन स्नॅचींगचे गुन्हे उघडकीस आले आहेत. त्यानुसार पोलिसांनी त्यांच्याकडून ५ लाख २ हजार ७०० रुपये किंमतीचे २९ मोबाईल फोन हस्तगत केले. या टोळीकडून आणखी काही मोबाईल स्नॅचींग आणि इतर गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.