मिरा-भाईंदर महापालिकेत ‘सीसीटीव्ही मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्ष'
डॉ. व्ही. एन. बेडेकर महाविद्यालयातील १७ ते १८ वयोगटातील विद्यार्थ्यांची झाली मतदार नोंदणी
उपविभागीय अधिकारी उर्मिला पाटील यांनी आयोजित केले विशेष शिबीर
ठाणे : भारत निवडणूक आयोगाने दिनांक 1 फेब्रुवारी 2024 या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदारयादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत दि. 27 ऑक्टोबर 2023 ते दि.9 डिसेंबर 2023 कालावधीत मतदारयाद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. तसेच मतदार नोंदणी करिता विशेष मोहीम दि. 4 नोव्हेंबर 2023 (शनिवार) व दि. 5 नोव्हेंबर 2023 (रविवार) व दि. 25 नोव्हेंबर 2023 (शनिवार) व दि.26 नोव्हेंबर 2023 (रविवार) या दिवशी विशेष मोहिमेचा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.
मतदार नोंदणी विशेष मोहिमेंतर्गत दि. 4 नोव्हेंबर 2023 रोजी उपविभागीय अधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी, 148 ठाणे विधानसभा मतदारसंघ उर्मिला पाटील यांनी विद्याप्रसारक मंडळाचे डॉ.व्ही.एन.बेडेकर महाविद्यालय, ठाणे येथे भेट देवून वय वर्ष 17 ते 18 वयोगटातील सर्व विद्यार्थ्यांना मतदार नोंदणी करणेबाबत आवाहन केले.नियुक्त मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्यामार्फत पात्र विद्यार्थ्यांचे नमुना 6 भरून घेण्यात आले.
148 ठाणे विधानसभा मतदारसंघामधील मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांमार्फत डॉ. व्ही.एन.बेडेकर कॉलेज, एन.के.टी कॉलेज येथे वय वर्ष 17 ते 18 वयोगटातील विद्यार्थ्यांची मतदार नोंदणीकरिता विशेष शिबिरे घेण्यात आली आहेत.
या मोहिमेंतर्गत विशेष मोहिमेच्या दिवशी नमुना 6 (मतदारयादीत नाव नोंदणी करण्याकरीता), नमुना 7 ( मतदारयादीतून नाव वगळण्याकरिता), नमुना 8 ( मतदारयादीतील नावात दुरुस्ती) चे सर्व अर्ज स्विकारण्यात येणार आहे.
148 ठाणे विधानसभा मतदारसंघातील एकूण 89 पदनिर्देशित ठिकाणी या कार्यालयाने नियुक्त केलेले मतदान केंद्रस्तरीय अधिकारी सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत उपस्थित राहणार आहेत.
सर्व नागरिकांनी मतदार नोंदणीच्या विशेष मोहिमेचा लाभ घेवून जास्तीत जास्त मतदार नोंदणी करावी, असेही आवाहन उपविभागीय अधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी, 148 ठाणे विधानसभा मतदारसंघ उर्मिला पाटील यांनी केले आहे.