ठाणे महापालिका शाळांतील विद्यार्थी बनणार पर्यावरण साक्षर

बीएनएचएस पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना देणार निसर्ग शिक्षण

ठाणे : ठाणे महापालिकेच्या शाळांमधील पाचवी ते दहावीत शिक्षण घेणाऱ्या सुमारे ७ हजार विद्यार्थ्यांना पर्यावरण साक्षर बनविण्यासाठी निसर्ग प्रशिक्षण उपक्रम यावर्षी पासून सुरू करण्यात आला आहे. ‘बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी'च्या (बीएनएचएस) सहकार्याने सदर उपक्रम होत असून महापालिकेच्या शाळांतील विद्यार्थ्यांसाठी विशेष कार्यक्रमाची आखणी करण्यात आली आहे.

ठाणे महापालिकेच्या शाळांतील विद्यार्थ्यांना पर्यावरण शिक्षण देणे असे या कार्यक्रमाचे उद्दिष्ट आहे. वंचित समाजातील, निम्न आर्थिक स्तरातून येणाऱ्या या विद्यार्थ्यांना निसग्रााविषयी जाणून घेण्याची, जैवविविधता संवर्धनाचे महत्त्व समजून घेण्याची संधी या निमित्ताने मिळणार आहे. त्यांच्या शैक्षणिक वाटचालीत सदर संधी मोलाची ठरेल, असा विश्वास महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी व्यक्त केला आहे.

सदर उपक्रमात ‘बीएनएचएस'चे शिक्षण अधिकारी आणि समन्वयक पर्यावरण जागरुकता या विषयावर संवादात्मक आणि संकल्पनांवर आधारित सादरीकरण आयोजित करतील. पक्षी, फुलपाखरे, वनस्पती, आपल्या सभोवतालची जैवविविधता, प्लास्टिक मुळे होणारे प्रदुषण, स्वच्छ भारत अभियान, पर्यावरणपुरक जीवनशैली यांच्याबद्दलचे कार्यक्रम शाळांमध्ये पुढील वर्षभर आयोजित केले जाणार आहेत. याशिवाय महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांसाठी संवर्धन शिक्षण केंद्र, ठाणे खाडी अशा वेगवेगळ्या ठिकाणी अभ्यास दौऱ्यासाठी नेण्यात येईल. खारफुटी, वनस्पती, पक्षी यांच्याबद्दलच्या नोंदी करण्यास मार्गदर्शन केले जाईल.

सदर उपक्रमामुळे महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांना निर्सग शिक्षण मिळेल, त्यातून पर्यावरण विषयक जागरुकता वाढेल. विद्यार्थ्यांना मुंबई-ठाण्यातील पर्यावरण, वने, वन्यजीव, जैवविविधता, त्यांच्या संवर्धनातील आपली भूमिका यांच्याबद्दल माहिती मिळेल. जास्तीत जास्त विद्यार्थी आणि शिक्षकांपर्यत सदर उपक्रम पोहोचवून पर्यावरण साक्षरता वाढवण्यास मदत होईल.

‘बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी' (बीएनएचएस)  भारतीय उपखंडातील सर्वात मोठी पर्यावरण संशोधन संस्था आहे. निसर्ग सवंर्धन, संशोधन आणि शिक्षण या तीन क्षेत्रात त्यांचा दांडगा अनुभव आहे. सुमारे १४० वर्ष जुनी असलेली सदर संस्था केंद्र सरकार, राज्य सरकार, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संशोधन संस्था यांच्यासह विविध प्रकल्पांच्या अनुषंगाने कार्यरत आहे. पर्यावरण संवर्धन आणि जतन यांच्यासाठी विविध उपक्रम संस्थेतर्फे राबविण्यात येतात. ठाणे खाडी क्षेत्र, पलेमिंगो संवर्धन यावरही संस्था काम करीत आहे. ठाणे महापालिकेचा शिक्षण विभाग आणि बीएनएचएस यांच्यात निसर्ग शिक्षण उपक्रमासाठी करार झाला असून त्याची अमलबजावणीही सुरु झाली आहे.

बीएनएचएस सारख्या नावाजलेल्या संस्थेचे निर्सग शिक्षणासाठी सहकार्य मिळाल्यामुळे महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांना खाजगी शाळांतील विद्यार्थ्यांप्रमाणेच एक चांगली संधी उपलब्ध होणार आहे. ठाण्याचे नागरिक म्हणून त्यांची जडण-घडण होत असताना पर्यावरणविषयक जागृती त्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी उपयोगी ठरेल. -अभिजीत बांगर, आयुवत-ठाणे महापालिका. 

Read Previous

पाचवी व आठवीच्या स्कॉलरशीप परीक्षेत नमुंमपा शाळेतील 49 विद्यार्थ्यांचे कौतुकास्पद यश

Read Next

 माझी वसुंधरा अंतर्गत महापालिका तर्फे जनजागृती