सागरी जीवसृष्टीवरील प्रकल्पाचे सादरीकरण

तज्ञांकडून मॉडर्न स्कुलच्या विद्यार्थिनींचे कौतुक

नवी मुंबई :समुद्रातील जीव सुरक्षित राहून पर्यावरणाचा समतोल राखला जावा यासाठी ‘रयत शिक्षण संस्था'च्या वाशी येथील मॉडर्न स्कुलच्या
विद्यार्थिनींनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करीत आविष्कार केला आहे. याप्रकल्पाचे नुकतेच बंगळुरु मध्ये आयोजित ‘चेंजमेकर्स ऑफ टुमारो ग्लोबल इव्हेंट'मध्ये सादरीकरण करण्यात आले.

‘शेल एनएक्सप्लोरर्स'च्या वतीने बंगळुरु येथे ‘चेंजमेकर्स ऑफ टुमारो ग्लोबल इव्हेंट'चे आयोजन करण्यात आले होते. शाश्वत भविष्याकडे वाटचाल करण्यासाठी पुढच्या पिढीला एकत्र आणणे, असा या उपक्रमाचा उद्देश आहे. यामध्ये महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व करीत मॉडर्न स्कुलच्या आठवी इयत्तेत शिकणाऱ्या प्रांजल उमेश भिलारे, मृणाल प्रशांत खाडे या दोन विद्यार्थिनींनी बायो ब्लुम इन्व्हेस्टिगेटर प्रकल्पाची प्रतिकृती सादर केली.

पाण्यावर तरंगणारे शैवाल (एकपेशीय वनस्पती) सूर्यप्रकाश समुद्राच्या तळापर्यंत पोहोचण्यापासून रोखतात आणि तेथील जीवसृष्टीच्या नाशासाठी कारणीभूत ठरतात. सदर प्रकार टाळण्यासाठी मॉडर्न स्कुलच्या विद्यार्थिनींनी समुद्राच्या पाण्याच्या पृष्ठभागावर एकपेशीय वनस्पतीशोधून ती रोबोटच्या मदतीने काढून टाकण्यासाठी प्रतिकृती तयार केली आहे. जेणेकरुन सूर्यप्रकाश खोल समुद्रात पोहोचून पाण्याखालील जीव सुरक्षित राहतील. यामुळे केवळ शाळेचीच नव्हे, तर संस्था आणि राज्याचीही मान उंचावली गेली आहे.

सदर उपक्रमात महाराष्ट्र व्यतिरिक्त दिल्ली, कर्नाटक, तामिळनाडू आणि गुजरात मधील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. तर ‘शेल एनएक्सप्लोरर्स'चे जागतिक नेते, शास्त्रज्ञ, उद्योजक आणि सुमारे ५२ देशांतील तज्ञ उपस्थित होते. यामध्ये तारिक हुसेन (ग्लोबल लीड इनोव्हेशन एक्सलन्स ॲट शेल) आणि ज्युली फेरलँड (व्हॉइस प्रेसिडेंट ऑफ इनोव्हेशन एक्सलन्स ॲट शेल) यांची विशेष उपस्थिती होती. त्यांनी मॉडर्न स्कुलच्या सदर प्रतिकृतीचे कौतुक केले.

दरम्यान, सदर यशाबद्दल मॉडर्न स्कुलच्या प्राचार्य सुमित्रा भोसले, इंग्रजी माध्यमाच्या पर्यवेक्षिका मनिषा संकपाळ, हना   सरेला, सहाय्यक व्यवस्थापक योगिता सुबेदी, ‘लिंक्स फाऊंडेशन'च्या सहाय्यक व्यवस्थापक नेहा सिंग यांनी या उपक्रमात सहभागी झालेल्या विद्यार्थिनींचे कौतुक केले.

Read Previous

पाचवी व आठवीच्या स्कॉलरशीप परीक्षेत नमुंमपा शाळेतील 49 विद्यार्थ्यांचे कौतुकास्पद यश

Read Next

ठाणे महापालिका शाळांतील विद्यार्थी बनणार पर्यावरण साक्षर