वाचन प्रेरणा दिनी ‘अग्निपंख'चे अभिवाचन

महापालिका विद्यार्थ्यांची डॉ. कलाम यांना वाचनांजली

नवी मुंबई : मिसाईल मॅन म्हणून सुपरिचित असणारे नामांकित थोर शास्त्रज्ञ, भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त ‘वाचन प्रेरणा दिन'चे औचित्य साधून नवी मुंबई महापालिका शाळांतील ६ विद्यार्थ्यांनी डॉ. अब्दुल कलाम यांचे प्रेरणादायी आत्मचरित्र ‘अग्निपंख' या पुस्तकातील दोन भागांचे अभिवाचन करीत आगळ्या-वेगळ्या पध्दतीने वाचनांजली अर्पण केली.

महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या संकल्पनेतून वाचन प्रेरणा दिनी आयोजित या अभिनव उपक्रमामध्ये महापालिका शाळा क्र.११७ दिवाळेगाव येथील कावेरी राठोड, किमया कोळी, तन्मय कोळी तसेच शाळा क्र.१०१ शिरवणे येथील मुस्कान अन्सारी, गोपाल गोस्वामी, प्रियंका नेटके या ६ विद्यार्थ्यांनी डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या ‘अग्निपंख' या आत्मचरित्रामधील ‘जडणघडण' या पहिल्या प्रकरणातील दोन भागांचे अभिवाचन करीत डॉ. कलामांचे बालपण, शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण या कालावधीतील आठवणींचा पट खुला केला.

डॉ. अब्दुल कलाम यांच्यासारखी महनीय व्यक्ती घडत जाण्याच्या वाटचालीतील अनुभवांचे वाचन विद्यार्थी करीत असताना श्रोते म्हणून उपस्थित असलेल्या इतर विद्यार्थ्यांना डॉ. कलामांच्या व्यक्तिमत्वाची सुरुवातीच्या काळातील जडणघडण तर कळलीच, शिवाय पुस्तकांसारखा मित्र नाही या डॉ. कलाम यांच्या अनुभवसिध्द वचनाचीही प्रचिती आली. या पुस्तकाचे २ भाग ऐकून संपूर्ण पुस्तक वाचून मिळविण्याची इच्छाही मनात उत्पन्न झाल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले.

यावेळी शिक्षण विभागाचे उपायुक्त दत्तात्रेय घनवट यांनी आवर्जुन उपस्थित राहून विद्यार्थ्यांचे कौतुक करीत त्यांचा उत्साह वाढविला. महापालिका मुख्यालयातील ॲम्फिथिएटर येथे आयोजित सदर कार्यक्रमाच्या प्रारंभी डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेस पुष्पमालिका अर्पण करुन जयंतीनिमित्त आदरांजली अर्पण करण्यात आली. जनसंपर्क अधिकारी महेंद्र कोंडे यांनी कार्यक्रमाचे आयोजन आणि सूत्रसंचालन केले. सदर उपक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षण विस्तार अधिकारी सुलभा बारघरे यांनी विशेष योगदान दिले. त्याचप्रमाणे माधुरी नारखेडे, प्रतिमा पारकर, दत्तात्रय वरगळ, सुशिला कराळे, सुहासिनी लोंढे, प्रशांत खांडगे, सुरेखा माळी, निशा कोळी, लक्ष्मण शिर्के, विनोदिनी पाटील यांचेही महत्वपूर्ण सहकार्य लाभले. 

 

Read Previous

पाचवी व आठवीच्या स्कॉलरशीप परीक्षेत नमुंमपा शाळेतील 49 विद्यार्थ्यांचे कौतुकास्पद यश

Read Next

महापालिकेच्या पर्यावरण विभागाच्या वतीने सेंट जोसेफ शाळेमध्ये पोस्टर स्पर्धा