नवी मुंबई मधील अनधिकृत शाळांना १५ कोटी ५४ लाख रुपये दंड

शिक्षण विभागाकडून शाळा बंद करण्याची वारंवार नोटीस

तुर्भे : नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील ४ अनधिकृत शाळांना १५ कोटी ५४ लाख १० हजार रुपये दंड आकारण्यात आला आहे, अशी माहिती नवी मुंबई महापालिका उपायुक्त दत्तात्रेय घनवट यांनी दिली.

नवी मुंबई मधील अनधिकृत शाळा बंद होत नाहीत. त्यामुळे अनधिकृत शाळांच्या संचालकांवर फौजदारी गुन्हे नोंद करण्यासाठी पोलीस ठाणे मध्ये तक्रार करावी, असे आदेश महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी शिक्षणाधिकारी अरुणा यादव यांना दिले आहेत.

महापालिका क्षेत्रात वर्ष २००० पासून अद्यापपर्यंत सुमारे ३५ अनधिकृत शाळा सुरु असल्याचे आढळून आले होते. या अनधिकृत शाळांना महापालिका शिक्षण विभागाकडून शाळा बंद करण्याची वारंवार नोटीस बजावण्यात आली होती. या नोटीसांना दाद न दिल्यास ४ अनधिकृत शाळांवर दंडात्मक कारवाई करण्याच्याही नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. नोटीस नंतर ४ पैकी केवळ ‘द ऑर्चिड इंटरनॅशनल स्कुल' या शाळेने ३ लाख १० हजार रुपये दंड भरला आहे. मात्र, अन्य कोणत्याही शाळेने महापालिकेच्या नोटीसीला दाद दिली नाही, असे महापालिका उपायुक्त दत्तात्रेय घनवट यांनी सांगितले.

दरम्यान, वारंवार नोटीसा पाठवल्यामुळे ३५ पैकी काही अनधिकृत शाळा बंद झाल्या आहेत. तर काही अनधिकृत शाळांना शासनाकडून मान्यता मिळाली आहे. तसेच नोटीसा पाठवण्याविना दुसरी कोणतीही कारवाई महापालिका द्वारे केली जात नसल्याने अनधिकृत शाळांच्या संचालकांचे चांगलेच फावले आहे. मात्र, आता राज्य शासनाच्या आदेशानुसार अनधिकृत शाळांच्या संचालकांवर  गुन्हे नोंद होतात की नाही, याकडे अनधिकृत शाळांमध्ये शिकणाऱ्या पाल्यांच्या पालकांचे लक्ष लागले आहे.

महापालिका तर्फे नोटीस बजावण्यात आलेल्या अनधिकृत शाळा
 - अल मोमिना स्कुल - आर्टिस्ट व्हिलेज, सेवटर-८ बी, सीबीडी. दंड - ५ कोटी ५० लाख २० हजार रुपये.
- इकरा इंटरनॅशनल स्कुल - सेक्टर-२७, नेरुळ. दंड - २ कोटी २४ लाख ७० हजार रुपये.
 - द ऑर्चिड इंटरनॅशनल स्कुल - सेक्टर-४०, सीवूड्‌स. दंड - १ कोटी १९ लाख ५० हजार रुपये.
- इलिम इंग्लिश स्कुल - आंबेडकर नगर, रबाळे. दंड - ६ कोटी ५९ लाख ७० हजार रुपये.

Read Previous

पाचवी व आठवीच्या स्कॉलरशीप परीक्षेत नमुंमपा शाळेतील 49 विद्यार्थ्यांचे कौतुकास्पद यश

Read Next

 महापालिका शाळांमध्ये दप्तरविना शाळा उपक्रम